नाशिक, 11 : यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेवून पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, लाभ क्षेत्र विकास प्राधिकारण नाशिकच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीमती. अलका अहिरराव, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचेसह पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या रोटेशनची तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले रोटेशन द्यायला हरकत नाही. तसेच ज्या ठिकाणी मागणी नाही अशा धरणांच्या लाभ क्षेत्रात पाण्याचे रोटेशन तुर्तास थांबवून त्याचा उन्हाळ्यासाठी विचार करण्यात यावा. रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी मिळेल याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. त्याचबरोबर लाभ क्षेत्राबाबत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व पाणी वाटप संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच वेळोवेळी निर्णय घेण्यात यावेत, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
याबैठकीत गंगापूर प्रकल्पातील डावा व उजवा कालवा, उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड, ओझरखेड प्रकल्प, चणकापूर प्रकल्पातंर्गत गिरणा कालवा, कडवा प्रकल्प यामधील उपलब्ध पाणीसाठा व त्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. भारती पवार, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी भाऊसाहेब ढिकले, रामदास आवारे, दत्तात्रय संगमनरे यांनी पाणी वाटपाबाबत असलेल्या समस्यांवर पालकमंत्री श्री. भुजबळ यांचेसाबत चर्चा करण्यात आली.