व्यापारीदृष्घ्टया एक उदयोग म्हणुन अळींबीची लागवड १९ व्या शतकातच प्रचलित झाली आहे. सद्या दोन डझन विविध प्रकारच्या व्यापारी तत्वावर जगभर लागवड केली जाते.
अळींबीचे महत्व
अळींबी खाण्यास स्वादिष्ट तर असतेच त्याशिवाय तिच्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे विपुल प्रमाणात असतात. अळींबीमध्ये साधारणपणे ३.५ टक्के प्रथीने असतात. हे प्रमाण आपल्या नेहमीच्या भाज्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. या शिवाय या प्रथिनाची पाचकता ७० ते ९० टक्के इतकी असते. अळींबीस एक विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो. जीवनाश्यक अमिनो आम्ले व ब, क, ड ही जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. अळीबीमध्ये लोह, कॅल्शीयम, पोटॅशियम आणि फॉस्फरस ही खनिजे मोठया प्रमाणात असतात. मधुमेह असणा-या व्यक्तीस कमी उर्जा व जास्त प्रथिनांचा आहार सुचविला जातो. अळींबी हे कमी उर्जा व जास्त प्रथिने युक्त अन्न आहे. अळींबी कार्बोदकामध्ये स्टार्च व शर्करा नसतात, ज्या मधुमेहींना वर्ज्य आहेत. त्यामुळे अळींबी हे मधुमेहींना एक औषध ठरते. धिंगरी अळींबीमध्ये मिथीओनिन जास्त प्रमाणात असते. ते यकृताच्या आरोग्यासाठी हितकारक असुन काविळ व यकृत उत्तकमुल्य यापासुन बचाव करते.
अळींबीमध्ये उर्जा, स्निग्धता, संयुक्त स्निग्ध आम्ले आणि सोडीयम याचे प्रमाण कमी असुन ते कोलेस्टेरॉलमुक्त आहे. उच्च रक्तदाब व रोहिणी काठीण्य या रोगांच्या नियंत्रणाकरीता एक उत्तम अन्न आहे. अळींबीमध्ये इव्हॅॲनिन नावाचा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा घटक आढळुन आला आहे. हा घटक चयापचयाची रक्तातील गती व कोलेस्टेरॉल उत्सर्जनाचे प्रमाण वाढवितो. इतकेच नव्हे तर अळींबीच्या सेवनाने ट्रायग्लीसराईड व फास्फोलिपीडच्या पातळीवरही नियंत्रण ठेवले जाते.
अळींबीमध्ये असलेल्या जलद्राव्य बहुशर्करामुळे कर्कपेशीच्या वाढीवर नियंत्रण येते. हा घटक कॅन्सर पेशींच्या श्वासोच्छवास प्रक्रीयेला विरोध करतो, म्हणुन अळींबी कॅन्सरसारख्या रोगावर उपयुक्त आहे. संशोधनाने सिध्द केलेल्या अळींबीच्या असाधारण बहुरंगी, बहुगुणांचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे जरुरी आहे.
अळींबी हे शेतातील वाया जाणा-या काडीकच-यावर वाढविता येते. प्रथिनांच्या उत्पादकतेचा विचार केल्यास अळींबीची प्रती हेक्टर उत्पादकता इतर कोणत्याही पिकापेक्षा जास्त आहे. अळींबीचे वैशिष्टे असे की, हिच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची सुपीक जमिनीची आवश्यकता नाही, तर हे घरात घेण्यासारखे, सुर्यप्रकाशाची आवश्यकता नसनारे व सेंद्रीय पदार्थांवर वाढणारे पिक आहे. प्रत्येक हवाई घनफळाचा उपयोग करुन अळींबीची उत्पादकता वाढविता येते. आपल्या देशात सहा दशलक्ष टनाहुन अधिक शेती अवशेषांची प्रति वर्षी निर्मिती होते, त्याचा प्रभावीपणे उपयोग अळींबी उत्पादनासाठी करता येतो.
अळींबीचे वर्गीकरण
माध्यमाच्या आवश्यकतेनुसार खाण्यायोग्य अळींबीचे खालील पाच प्रकार आहेत.
१. वनस्पतीच्या ताज्या अवशेषांवर वाढणारी अळींबी.
उदा. लेन्टीनस, ल्फॅम्युलीना, ॲरिक्युलेरिया, फोलिओटा, ट्रेमेला, प्ल्युरोटस
२. अर्धवट कुजलेल्या सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी
उदा. व्होल्वेरियल्ला, स्ट्रोफेरिया, कोप्रिन्स
३. संपुर्णपणे कुजलेल्या सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी
उदा. ॲगॅरिकस
४. माती व सेंद्रीय पदार्थांवर वाढणारी अळींबी
उदा. लेपिओटा, मोर्चेला
५. उच्च वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी अळींबी
उदा. टयुबर, मोर्चेला, लॅक्टॅरिअम, केनथारेलस
आपल्या देशात तीन प्रकारच्या अळींबीची लागवड मोठया प्रमाणावर केली जाते. या अळींबीना त्यांच्या वाढीसाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते. व्यापारीतत्वावर अळींबीची लागवड करण्यापुर्वी या विशिष्ट तापमानाची आवश्यकता लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या देशात व्यापारी तत्वावर लागवड करण्यात येणा-या अळींबीच्या जाती व त्यांच्या वाढीस लागणारे अनुकूल तापमान खालील प्रमाणे आहे.
अळींबीच्या जाती | अनुकूल तापमान |
१. बटन अळींबी किंवा युरोपियन अळींबी
(ॲगॅरिस बायस्पेारस) |
अ. वाढीसाठी २४ ते २६ सें. ग्रे.
ब. पिकासाठी १६ ते १८ से. ग्रे. |
२. धिंगरी अळींबी ओएस्टर अळींबी (प्ल्युरोटस) | २० ते ३० से. ग्रे. |
३. भाताच्या काडावरील अळींबी (व्होल्वेरियल्ला) | ३० ते ४० से. ग्रे. |
धिंगरी अळींबीची लागवड
धिंगरी अळींबीची लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य :
१. भाताचा पेंढा, गव्हाचे काड, उसाचे पाचट, कापसाचे काड, सोयाबीनचे काड किंवा कोणत्याही वनस्पतीचा / पिकाचा पालापाचेाळा
२. स्पॉन (अळींबी बी)
३. ३५ x ५० से.मी. मापाची प्लस्टिकची पिशवी
४. काड भिजवीण्याची टाकी
लागवडीचे यंत्र
१. प्रथम अळींबी लागवडीस वापरायचे काड / पालापाचोळयाचे ३ – ४ सें. मी. लांबीचे तुकडे करुन घ्यावेत. ते पोत्यात भरु स्वच्छ पाण्यात १० ते १२ तास भिजत घालावेत. त्यानंतर ते पाण्यातुन काढुन ४ तास निचरत ठेवावे, म्हणजे जास्तीचे पाणी त्यातुन निघुन जाईल.
२. काडाचे निर्जतुकीकरण : या प्रक्रियेमुळे काडावर व पाण्यात असलेल्या वेगवेगळया जंतुंचा नाश होतो. हे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काड ८० ते ८५ सें. ग्रे. तापमानाच्या पाण्यात ३० ते ४५ मिनिटे बुडवुन काढावे अथवा उकळयात पाण्यात १० ते १५ मिनीटे बुडवावे. काडाचे पोते पाण्यात पुर्ण बुडून जाईल याची काळजी घ्यावी. या काडाचे रासायनिक निर्जंतुकीकरण सुध्दा करता येते. त्यास ७.५ ग्रॅम बाविस्टीन + १२५ मि.ली. फॉर्मेलीन १०० लिटर पाण्यात मिसळुन त्यामध्ये काड १५ तास भिजत ठेवावे व निर्जंतुकीकरणानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी पोते तिवईवर सावलीत ठेवावे.
३. निर्जंतुक केलेले काड प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतांना स्वच्छतेची खबरदारी अतिशय महत्वाची असते. त्यासाठी पिशवी भरण्याची जागा स्व्च्छ, निटनेटकी व बंदिस्त असावी. लागणारे सर्व साहित्य २ टक्के फॉर्मेलिनने निर्जंतुक करावे. प्रथम पिशवीच्या तळाशी २ ते ३ इंच काडांचा थर ठेवुन त्यावर स्पॉन पेरावे. काड भरत असतांना ते तळहाताने हलकेसे दाबावे. काड, स्पॉन याचे एकावर एक या प्रमाणे ५ ते ६ थर भरावेत. नंतर पिशवीचे तोंड घट बांधुन सर्व बाजुंनी २० ते २५ ठिकाणी छोटया खिळयाने किंवा दाभणाने छिद्रे पाडावीत व त्या पिशव्या मांडणीच्या कठयावर अुवा तिवईवर स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.
४. काडावर आळींबीच्या बुरशीची पुर्ण वाढ २५ सें. ग्रे. तापमान १५ दिवसात होऊन काडयाचा रंग पांढरा दिसतो. टाचणीच्या टोकाऐवढी अंळिबी प्लॅस्टीकच्या पिशवीत दिसुन लागल्यास वरील पिशवी ब्लेडने अलगद कापावी व वेगळी करावी. बेड १५ सें. मी. अंतर ठेवुन ओटयावर ठेवावेत. हवामानावर बेडवर दिवसातुन २ ते ३ वेळेस पाण्याची फवारणी करावी. जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडुन खोलीत आर्द्रता ८५ टक्कयापर्यंत राहील याची काळजी घ्यावी. पुढील ३ – ४ दिवसांत ८ – १० सें. मी. व्यासाची पांढरी किंवा करडया रंगाची शिंपल्यासारखी अळींबी तयार होते. पक्व अळींबी काढण्यापुर्वी ४ – ६ तास अगोदर बेडवर पाणी शिंपडु नये. पुर्ण वाढलेली अळींबी स्वच्छ चाकु किंवा ब्लेडच्या साहयाने हळुवार कापुन घ्यावी. त्यानंतर स्वच्छ करुन अळींबी सछिद्र प्लास्टीकच्या पिशव्यात भरुन विक्रीसाठी पाठवावीत. पुर्ण वाढ झालेली अळींबी काढल्यानंतर २ ते ३ वेळेस पाणी घालावे. साधारणपणे ८ – १० दिवसांनी दुसरे तर परत ८ – १० दिवसांनी तिसरे पिक त्याच बेडवर तयार होते. दोन किलो वाळलेल्या काडाच्या एका बेडपासुन ४५ दिवसात १.५० ते १.७५ किलो अळींबीचे उत्पादन मिळते.
अळींबी वाळवुन ठेवण्याची पध्दत
जरुरीपेक्षा जास्त अळींबी तयार झाल्यास अथवा वाळविलेल्या अळींबी विकावयाची असल्यास खालील प्रमाणे प्रक्रीया करावी.
गार पाण्यात प्रथम अळींबी स्वच्छ धुवावी. नंतर पातळ फडक्यात अळींबी बांधुन ती उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनीटे ठेवावी. त्यानंतर ती गार पाण्यात ठेवुन थंड करावी. या प्रक्रीयेला ब्लॅचिंग म्हणतात. अळींबीतील जादा पाणी काढुन झाल्यावर ती उघडयावर परंतु सावली वाळवावी. अळींबी पुर्ण वाळल्यावर प्लॅस्टीकच्या पिशवीत भरुन सील करावी.
अळींबी उत्पादन आर्थिक बाजु –
धिंगरी अळींबीच्या लागवडीसाठी अंदाजे कमीत कमी किती खर्च येईल याचा तपशील खालील प्रमाणे दिला आहे.
अ.क्र. | तपशील | अंदाजे खर्च |
१. | मांडणी / रॅक | १०००० |
२. | स्पॉन / अळींबीचे बियाणे | २००० |
३. | गव्हाचे काड | २००० |
४. | पॉलीथीन बॅग | १००० |
५. | खोलीतील वातावरण थंड व आर्द्रतायुक्त | २००० |
६. | ठेवण्यासाठी वाळयाचे पडदे | २००० |
७. | इतर संकीर्ण | १००० |
एकुण खर्च | २००००/- |
या प्रमाणे प्रथम रु. २००००/- गुंतवणुक करुन फायदेशिररित्या उत्पादन सुरु करता येईल
अळींबीवरील रोग व त्यांचे नियंत्रण
अ. बुरशीमुळे होणारे रोग :
१ मऊ भुरी रोग किंवा कॉबवेब रोग (सॉफ मिल्डयु)
२ तपकिरी बुरशीचा मुलामा (ब्राऊन पलास्टर मोल्ड)
३ कोरडा फुगा (ड्राय बबल)
४ भुमीगत अळींबी रोग (फाल्स ट्रफल)
५ ट्रायकोडर्मा मुळे होणारे रोग
ब. जीवाणुमळे होणारे रोग :
१. तांबडया आकाराचे ठिपके / जीवाणंचे ठिपके (ब्राऊन ब्लॉच / बॅक्टेरीअल स्पॉट)
नियंत्रणाचे उपाय :
- या रोगाचा प्रसार अपूर्ण निर्जंतुक केलेली माती, रोगाची लागण झालेले इतर साहित्य यामुळे होतो. म्हणुन अळींबी लागवडीसाठी लागणारे संपुर्ण साहित्य निर्जंतुक करुनच वापरायला हवे.
- अळींबीच्या खोलीतील आर्द्रता ८० टक्कयापर्यंत ठेवावी.
- क्लोरीनच्या पाण्याचा वापर करावा, त्यामुळे रोगाची लागण कमी होण्यास मदत होईल
- वापरात असलेले सर्व साहित्य फॉर्मेलीनच्या ४ – ५ टक्के द्रावणाने निर्जंतुक करावे
- केसिंगसाठी वापरण्यात येणारे मिश्रण निर्जंतुक करुनच वापरावे
- लागण झालेल्या ट्रेला निर्जंतुक करुनच पुढील कामासाठी वापरावे.
अळींबीवरील किडी आणि त्यांचे नियंत्रण
ज्या प्रमाणे शेतातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो, त्याच प्रमाणे अळींबीवर सुध्दा विविध किडींची लागण होत असल्याचे आढळुन आलेले आहे. अळींबीवर प्रामुख्याने सियारीड माशी, फोरिड माशी, सेशिडस माशी, माईटस (कोळी), सुत्रकृमी व स्प्रिंग टेल्स या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येतो. या किडी अळींबीवर हल्ला करुन त्याची कुज घडवुन आणतात. काही किडी कंपोस्ट व अळींबीवर अंडे घालुन त्यावर उपजीवीका करतात. त्याच प्रमाणे अळया अळींबीच्या देठांना पोखरुन खातात त्यामुळे अळींबीची वाढ खुंटते व परिणामी उत्पन्नावर फरक पडतो.
नियंत्रण
सियारिड माशी, फोरिड माशी, सेशिडस माशांना आकर्षित करुन घेण्यासाठी स्पॉनिंग रुममध्ये चिकट सापळयाचा वापर करावा.
पायरेथ्रिन्स (०.०३ टक्के) या द्रावणाची फवारणी माशांचा प्रादुर्भाव दिसताच करावी.
अळींबीच्या वाढीच्या वेळेस सर्व ठिकाणी स्वच्छता पाळावी.
ज्या लाकडी ट्रे वर अळींबीचे उत्पादन घ्यावयाचे आहे तो लाकडी ट्रे दोन टक्के सोडियम पेन्टाक्लोरिफेनेटच्या द्रावणात बुडवुन घ्यावेत.
सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ४० मि.ली. निमॅगॉन १० लिटर पाण्यात मिसळुन कंपोस्टमध्ये फवारावे.
माईटस या किडीच्या नियंत्रणासाठी लिन्डेन पावडर (०.६५ टक्के) दर १०० किलो कंपोस्टमध्ये ८०० ग्रॅम या प्रमाणता मिसळावी.
(अधिक माहिती साठी विभाग प्रमुख, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्याशी संपर्क साधावा. )