काय आहे जनावरांचा दुग्धज्वर (मिल्क फीवर)? कसे करतात उपचार ?

 आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी त्यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो.  आहाराचे योग्य व्यवस्थापन करून व पशुतज्ज्ञांकडे योग्य  उपचार करून हा आजार टाळता येतो.

दुग्धज्वर किंवा मिल्क फिवर हा आजार साधारणपणे जास्त दूध देणा-या गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. जास्त दूध देणारी जनावरे त्यांच्या तिस-या ते पाचव्या वितामध्ये या आजारास बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पहिल्या किंवा दुस-या वितामध्ये जनावरे कमी वयाची किंवा तरुण असतात. या वयामध्ये जनावराची चा-यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शियमचे प्रमाण यांमुळे हा आजार होण्याचा धोका फार कमी असतो. हा आजार मुख्यत्वे संकरित गाई व म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. मुख्यतः ही कमतरता ५ ते १o वर्षे वयाच्या गाई आणि म्हशींमध्ये जास्त आढळून येते. गाई आणि म्हशी विल्यानंतर ४८ तासांच्या आत अचानक कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. विल्यानंतर १ ते ३ दिवसांत रोगाची लक्षणे दाखविण्यास सुरुवात करते. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन जनावर खाली बसते अशी मुख्य लक्षणे दिसू लागतात.

आजाराची कारणे

रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हे या आजाराचे मुख्य कारण आहे. यासाठी खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.

गाभण किंवा दुधाळ जनावरांतील कॅल्शियमची वाढलेली गरज

चारयातून कमी प्रमाणात कॅल्शियम मिळणे. जनावरांच्या आहारात

कॅल्शियम व स्फुरदाचे योग्य प्रमाण नसणे (२:१) तसेच ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता

आतड्यांमधून चान्यातील कॅल्शियमचे शोषण न होणे.

जनावर विण्यापूर्वी गाभण काळात गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम देणे.

शरीरात पॅराथारमोन या संप्रेरकाची कमतरता किंवा कॅल्शिटोनीनचे अधिक प्रमाण.

आहारात ऑक्झेलेट आणि मॅग्रेशियमचे प्रमाण अधिक असणे.

विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर जनावराची होणारी उपासमार तसेच विण्याच्या सुमारास जनावरावर येणारा ताण.

शेतकरी उसाच्या हंगामात दुधाळ जनावरांना उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालतात. वाढ्यांमध्ये असणारे ऑक्झेलेट चा-यातील कॅल्शियमबरोबर संयुग तयार करून शेणावाटे बाहेर निघून जाते. त्यामुळे जनावरास कॅल्शियम मिळत नाही. यामुळे उसाचे वाढे हे कॅल्शियम कमी होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

हिवाळा हा म्हशींचा विण्याचा हंगाम असतो आणि यामध्ये जास्त थंडी, हिरवा चारा न मिळणे व जास्त दूध उत्पादन या कारणांनी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो.

आजाराची लक्षणे

प्रथम अवस्था – ही अवस्था फार कमी काळ राहत असल्यामुळे ब-याचदा लक्षात येत नाही. यामध्ये जनावर सुस्त होते आणि चारा खाणे व दूध देणे कमी करते . डोके हलविणे , सतत जीभ बाहेर काढणे , दात खाणे , अडखळतचालणे अशी लक्षणे दिसू लागतात.

द्वितीय अवस्था – या अवस्थेत जनावर खाली बसते. ते उभे राहू शकत नाही. बसलेल्या अवस्थेत मान एका बाजूला वळवते. शरीर थंड पडते, श्वासोच्छुास व नाडीचे ठोके जलद होतात, नाकपुड्या कोरड्या पडतात. शेण टाकणे व लघवी करणे बंद होते. दूध देणे बंद होते, रवंथ करणे थांबून पोट फुगते. आवाज दिल्यास किंवा उठविण्याचा प्रयत्न करूनही जनावर उभे राहत नाही.

तिसरी अवस्था – या अवस्थेमध्ये जनावरे आडवी पडतात. श्वासोच्छुास मंद होतो. लावला असता पापण्यांची हालचाल होत नाही. या अवस्थेत उपचार झाला नाही, तर जनावर दगावते. या आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फोवर असे नाव असले, तरी यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी झालेले असते व जनावरास ताप नसतो. उपचार कॅल्शियम बोरोग्लुकोनेट २५ टक्के इंजेक्शन साधारण १ मिलि प्रतिकिलो वजन या प्रमाणात शिरेतून दिल्यास जनावरे बरी होतात. औषध वेगाने किंवा अधिक प्रमाणात दिल्यास कॅल्शियमची विषबाधा होते. यासाठी इंजेक्शन हळुवारपणे देण्याची काळजी पशुवैद्यकीय तर काहींमध्ये कृचितच दुस-या आणि तिस-या दिवशी इंजेक्शन देण्याची गरज भासते. पुरेसा किंवा तत्काळ उपचार न होणे किंवा कमी प्रमाणात इंजेक्शन देणे यांमुळे आजार बरा होत नाही. आजारातून बरे होण्याचे लक्षण म्हणजे जनावर उठून उभे राहते. नाकपुड्या ओल्या होऊन शरीराचे तापमान पूर्ववत होते. चारा खाणे, लघवी करणे आणि शेण टाकणे सुरू होते.

प्रतिबंधात्मक उपाय

विण्यापूर्वी जनावरास योग्य आहार द्यावा.

गाभण काळात खूप जास्त प्रमाणात खुराक देऊ नये, तसेच उपासमारही होता कामा नये.

गाभण काळात जनावरांना थोडेसे फिरवल्यास व्यायाम मिळतो व कॅल्शियमची चयापचय क्रिया कार्यशील राहते.

गाभण तसेच विलेल्या जनावरास साधारण ५0 ग्रॅम खनिज मिश्रण खुराकातून द्यावे.

जनावरास साळीचे तण, उसाचे वाढे जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.

विण्यापूर्वी साधारण एक आठवडा जीवनसत्व ड’चे इंजेक्शन देणे फायदेशीर ठरते.

जनावर विल्यानंतर शिरेवाटे किंवा खुराकातून कॅल्शियम दिल्यास उपयुक्त ठरते.

 

-डॉ .गणेश यु.काळुसे.

(विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र )

डॉ .सी .पी जायभाये

(कार्यक्रम समन्वयक )

कृषि विज्ञान केंद्र , बुलढाणा

फोन नं.9011021280