भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घसरण; 132 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 4.28 लाख वर
भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत लक्षणीय घसरण होत असून आजची रुग्णसंख्या 4,28,644 इतकी आहे. गेल्या 132 दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. याआधी, गेल्या 23 जुलै 2020 रोजी सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 4 लाख 26 हजार 167 इतकी होती.
भारतात आता सक्रीय कोविड रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत असून सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या फक्त 4.51% इतकी झाली आहे.
देशात नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींची संख्या गेले तीन दिवस सातत्याने 30 हजारांपेक्षा कमी असलेली दिसून आली आहे. देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 36,604 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, या कालावधीत 43,062 जण रोगमुक्त होऊन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेले पाच दिवस बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्याने बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.
नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या आणि रोज नोंदल्या जाणाऱ्या नवीन बाधीतांची संख्या यांच्यातील फरक वाढत चालला आहे. कोविड बाधित बरे होण्याचे प्रमाण 94.03% वर पोहोचले आहे.
कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या 89,32,647 झाली. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस सतत वाढतच असून 80 हजारांचा आकडा पार करून सध्या ही तफावत 85,04,003 इतकी आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 78.35% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एकवटलेले आहेत.
देशभराचा विचार करता, महाराष्ट्रात एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6,290 इतकी असून त्याखालोखाल केरळमध्ये 6,151 तर दिल्लीत 5,036 रुग्ण रोगमुक्त झाल्याची नोंद झाली आहे.
नोंद झालेल्या नव्या कोविड बाधितांपैकी 77.25% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,375 व्यक्ती नव्याने कोविड बाधित झाल्याची नोंद झाली, त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,930 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशभरात गेल्या 24 तासांत 501 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 79.84% रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. या मध्ये, सर्वात जास्त म्हणजे 95 रुग्ण महाराष्ट्रातील होते तर दिल्लीत 86 आणि पश्चिम बंगालमध्ये 52 रुग्णांचा मृत्यु झाला.