भारतातील उत्तम दर्जाच्या कृषी उत्पादनांची उपलब्धता वाढवण्यासाठी मदत होणार
इफ्को कंपनीची ई-वाणिज्य शाखा www.iffcobazar.in, ने भारतीय स्टेट बँकेच्या योनो कृषी अॅपशी भागीदारी केली असल्याचे जाहीर केले आहे. योनो कृषी अॅप हे शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक बाबींशी निगडीत समर्पित पोर्टल आहे. या भागीदारीमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना कृषी उपकरणे आणि उत्पादने सहजतेणे उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यांना इफ्कोची उत्तम दर्जाची उत्पादने उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांना या अॅपवरून त्याची ऑनलाईन किंमत देता येईल.
www.iffcobazar.in हे भारतातील आघाडीच्या कृषी आधारित ई-कॉमर्स पोर्टलपैकी एक आहे. इफ्को या देशातील सर्वात मोठ्या खत उत्पादक संस्थेचे हे पोर्टल आहे. हे पोर्टल 12 भाषांमध्ये उपलब्ध असून देशभरात त्यांच्या उत्पादनांची मोफत डिलिव्हरी सेवा आहे. देशातील 26 राज्यात या कंपनीची 1200 पेक्षा अधिक उत्पादने आहेत. या पोर्टलवर विविध प्रकारची कृषी उत्पादने उपलब्ध आहेत.
या भागीदारीविषयी बोलतांना इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक यु एस अवस्थी यांनी सांगितले की इफ्को आणि भारतीय स्टेट बँक या देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक संस्थांपैकी एक आहेत. देशाच्या एकात्मभावनेने आम्ही एकत्र आलो असून हा दोन्ही संस्थांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या एकत्रित उर्जेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 50 वर्षांपासून इफ्को देशातील शेतकऱ्यांच्या सेवेत आहे, असे सांगत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय स्टेट बँक देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली असून, एसबीआय योनोच्या माध्यमातून, iffcobazar.in पोर्टलच्या माध्यमातून इफ्को बाझारला योनोच्या 3 कोटी नोंदणीकृत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, ज्यापैकी बहुतांश शेतकरी आहेत, असे ते म्हणाले.