ऊस कीड व्‍यवस्‍थापन

ऊसावरील खोडकिडा :

अळी भुरकट रंगाची असून खोड पोखरते व त्यामुळे ऊसाचा शेंडा वाळून जातो.
व्यवस्थापन : ऊस लागवडीच्या वेळी खाली नमुद केलेल्यापैकी दाणेदार कीडनाशक जमिनीत मिसळावे व नंतर बेणे लावावे. कार्बारिल ४ टक्के.

शेंडा पोखरणारी अळी :

अळी पिवळसर असते. ती प्रथम पानाच्या मुख्य शिरात शिरते व शेंडयाकडे पोखरत जाते, त्यामुळे शेंडा मरतो व ऊसास अनेक फुटवे फुटतात.
व्यवस्थापन : क्विनॉलफॉस २५ ईसी १००० मि. लि. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. दोन आठवडयाच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी वरील प्रमाणे करावी.

 

पानावरील तुडतुडे (पायरीला):

अपूर्ण अवस्थेतील तुडतुडे रंगाने दुधी असून पूर्ण वाढलेले तुडतुडे पिवळसर असतात. डोके टोकदार असते. तुडतुडे पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात व ऊसातील साखरेचे प्रमाण घटते.
व्यवस्थापन : डायमेथोएट ३० ईसी १००० मिलि किंवा मॅलाथियॉन ५० ईसी ८५० मिलि किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी १२०० मिलि किंवा फेनिट्रोथिऑन ५० ईसी ६०० मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ ईसी ८५० मिलि १००० लिटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारावे, आवश्यक असल्यास १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी. या किडीसाठी जरी किटकनाशके उपयुक्त असली तरी वाढलेल्या उसात शिरता येत नसल्यामुळे फवारणी अथवा धुरळणी करणे अशक्य होते. तेंव्हा इपिरीकेनीया (एपीपायरोप्स) मेलॅनोल्युका या परोपजीवी किटकाचे कोष सुमारे ५००० प्रति हे. किंवा ५ लाख अंडी पायरीलाग्रस्त शेतात सोडावेत.

देवी अथवा खवले कीड
ओळख व नुकसानीचा प्रकार : कीड फिक्कट काळसर असून ऊसाच्या कांडीवर पुजंक्यात आढळते. अपूर्ण व पूर्ण वाढलेली कीड कांडयातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस निस्तेज होतो, कांडया बारीक बारीक पडतात व साखरेचे प्रमाण घटते.
व्यवस्थापन : ऊस कापणीनंतर पाचट, धसकटे इत्यादी जाळून टाकावे. मॅलेथीऑन ५० ईसी २००० मिलि किंवा डायमिथोएट ३० ईसी २६५० मिलि १००० लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात. ऊस लावतेवेळी बेणे डायमिथोएट ३० ईसी २६५ मिलि किंवा मॅलाथिऑन ५० ईसी २०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून होणा-या द्रावणात बुडवून लावावे.

पांढरी माशी :

बाल्यावस्थेत ही कीड सुरुवातीस पिवळसर व नंतर काळसर करडया रंगाची दिसते. तसेच तिच्या कडेला पांढ्यया रंगाचे तंतू दिसतात. कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून रस शोषण करते.

व्यवस्थापन : खताच्या मात्रा शिफारशीप्रमाणेच द्याव्यात. नत्राच्या जास्तीचा वापर करुन नये. क्रायसोपरला कारनीया (क्रायसोपा) हया भक्षकाचे १००० प्रौढ किंवा २५०० अळया प्रति हेक्टरी सोडाव्यात. अतिप्रादुर्भावग्रस्त शेतातील काळे कोष असलेली पाने काढून डायक्लोरोव्हास ७६ ईसी हे कीटकनाशक ११०० मिलि किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी १६०० मिलि किंवा डायमिथोऐट ३० ईसी २६५० मिलि किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ ईसी ३२०० मिलि किंवा मॅलेथिऑन ५० ईसी २००० मिलि १००० लिटर पाण्यातून १५ दिवसाचे अंतराने दोन वेळा फवारावे.

पांढरा लोकरी मावा :

या किडीची पिल्ले पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून तिस-या अवस्थेनंतर त्यांच्या पाठीवर पांढरे लोकरीसारखे तंतू दिसतात. प्रौढ हे काळे व पारदर्शक पंखाच्या दोन जोडया असलेले असतात. पिल्ले आणि प्रौढ मावा ऊसाच्या पानातील रस शोषण करतात, यामुळे पानांवर पिवळसर ठिंपके दिसतात व पाने कोरडे पडून वाळतात. ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, उत्पन्नात व साखर उता-यात घट येते. याशिवाय माव्याने बाहेर टाकलेल्या मधारासारख्या विष्ठेमुळे पानावर काळी बुरशी वाढून पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

व्यवस्थापन :
· ऊसाची पट्टा अथवा रुंद सरी पध्दतीने लागण करावी जेणे करुन पीक संरक्षण उपाययोजना करणे सोयीस्कर होईल.
· सुरुवातीस कमी प्रादुर्भाव असलेल्या शेतातील कीडग्रस्त पाने तोडून जाळून टाकावीत.
· कीडग्रस्त शेतातील पाने दुस-या शेतात नेऊ नयेत.
· कीडग्रस्त बेणे वापरु नये.
· फवारणीनंतर १० ते १५ दिवस ऊस किंवा ऊसाचे वाढे जनावरांना खाऊ घालू नये.
· कोनोबाथ्रा अफिडोव्होरा या परभक्षी मित्र किटकांची २५०० अंडी किंवा १००० अळया प्रति हेक्टर सोडाव्यात.
· क्रायसोपा या परभक्षी मित्र किफ्काची २५०० अंडी/ अळया प्रती हेक्टरी सोडाव्यात.
· जैविक मित्र कीटक शेतात सोडल्यावर किटकनाशकांची फवारणी ३ ते ४ आठवडे करुन नये.
· फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्यापूर्वी तीन महिने वापरु नये.
· शेतात किटकनाशकाचा वापर करतांना हातमोजे व चेह-यावर मास्कचा वापर करावा.

· पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटॉन मिथाईल २५ टक्के प्रवाही ६०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस) १०५० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस), १५०० मिलि १००० लिफ्र पाण्यामध्ये (मोठा ऊस) किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही ६०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस), १०५० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस) १५०० मिलि १००० लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस) किंवा मॅलेथिऑन ५० टक्के प्रवाही ८०० मिलि ४०० लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस) १४०० मिलि ७०० लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस) २००० मिलि १००० लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस) मिसळून फवारणी करावी किंवा फोरेट १० ली दाणेदार १५ किलो प्रति हेक्टरी टाकण्याची शिफारस केली आहे.

(सौजन्‍य : कीडकशास्‍त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी )