राज्यात सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करा

कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई- राज्यात सेंद्रीय शेतीला चालना देण्याकरिता राज्य सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.  सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीबाबत मंत्रालयात आज बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही यंत्रणा तातडीने उभारण्यासंदर्भात विभागाला सूचना दिल्या. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

भारतात खासगी संस्थांमार्फत सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण केले जाते. त्यासाठी राज्यामध्ये शासकीय यंत्रणा उभी करुन सेंद्रीय शेतीला चालना देतानाच शेतकऱ्यांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे. या सेंद्रीय उत्पादने प्रमाणीकरण यंत्रणेच्या स्थापनेसाठी 11 सदस्यीय नियामक मंडळाची रचना प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी आकृतीबंध तयार करण्यात आला आहे.

यावेळी झालेल्या बैठकीत या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेला भाजीपाला, फळे स्थानिक ठिकाणी विकण्यासाठी यंत्रणा निर्माण करुन देण्यात येत असून त्यासाठी कृषी विभागातर्फे छत्री असलेला स्टॉल उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विक्री करणे शक्य होईल. विशेषत: महामार्गालगत अशा प्रकारच्या थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

 प्लास्टिक आच्छादनाचे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरु करा

द्राक्ष व डाळिंब फळबाग शेतीसाठी प्लास्टिक आच्छादन देण्यासंदर्भात आढावा बैठक कृषीमंत्र्यांनी घेतली. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार अनिल बाबर आदी उपस्थित होते. प्लास्टिक आच्छादनाचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प सुरु करावा, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. आच्छादनासाठी परदेशात कशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते, भौगोलिक परिस्थिती आदीबाबत अभ्यास करुन त्याचे प्रारुप दोन महिन्यात सादर करावे. ते मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्याचबरोबर केंद्र शासनाकडेही पाठविले जाईल, असे श्री. भुसे यांनी सांगितले.