आता मास्कवर येणार पोस्टाच्या तिकिटांचे शिक्के

भारतीय टपाल, मुंबई मुख्य कार्यालयात उद्या ‘फिलेटली दिना’निमित्त शिक्का असलेल्या विशेष मास्कचे प्रकाशन

13 ऑक्टोबर हा दिवस ‘फिलेटली’ दिवस म्हणून साजरा केला जातो.टपाल तिकिटांचा संग्रह आणि अभ्यास करणाऱ्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. भारतीय टपाल खात्याच्या मुंबई कार्यालयात, गेल्या 9 ऑक्टोबरपासून, राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याच मालिकेत, उद्या, फिलेटली  दिनानिमित्त, एका विशेष वस्तूचे-‘शिक्के असलेल्या मास्क्सचे’, प्रकाशन केले जाणार आहे.या मास्क वर, टपाल तिकिटांचे प्रिंट उमटवलेले असेल.मुंबई टपाल विभागाचा हा उपक्रम म्हणजे, मास्क अधिक आकर्षक बनवण्याचा आणि सध्याच्या कोविडच्या काळात मास्कचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.

सरकारच्या इतर विभागांप्रमाणेच, मुंबईतील मुख्य टपाल कार्यालय देखील कोविड-19 विषयी जनजागृती करण्यात आघाडीवर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या कोविड विषयक जनचळवळीत आपला सहभाग देत आहे. मास्कचा वापर हा या मोहिमेतील महत्वाचा संदेश आहे

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त ही या विभागाने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. आठवड्याचा प्रत्येक दिवस विभागातील वेगवगेळ्या टपाल सेवेला समर्पित आहे, जसे की बँकिंग दिवस, टपाल आयुर्विमा दिवस इत्यादी.

मुंबईच्या मुख्य टपाल व्यवस्थापक, स्वाती पांडे यांनी याविषयी माहिती देतांना संगीतले की, “एक आभासी कार्ड, ज्यात पोस्टमन/पोस्टवूमन यांचे नाव, क्षेत्र क्रमांक, सेवाक्षेत्राचे नाव, संपर्क क्रमांक आणि फोटो इत्यादी असेल, ते सर्व ग्राहकांपर्यंत पोहचवले जाईल, जेणेकरून काही सेवा हवी असल्यास अथवा आपत्कालीन स्थितीत ग्राहक त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतील.” सध्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात 1,549 पोस्टमन कार्यरत आहेत.

कोविड-19 च्या काळात, जेव्हा कुरियर सेवा बंद होती, तेव्हा टपाल कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्वाची कामे केलीत. याकाळात, गरजूंपर्यंत वैद्यकीय सांधणे आणि पीपीई किट्स, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीवेतन, पार्सल इत्यादी पोहोचवण्याची मानवतावादी कामे त्यांनी केलीत ती निश्चितच कौतुकास्पद आहेत, असेही स्वाती पांडे यांनी सांगितले.