भारतात गेल्या 12 दिवसांमध्ये 10 लाख रूग्ण कोरोनामुक्त

सलग 11 व्या दिवशी भारतामध्ये 10 लाखांपेक्षा कमी लोक कोरोनाबाधित

भारतामध्ये कोविड-19 महामारीला अतिशय सक्षमतेने तोंड दिले जात आहे. भारतामध्ये कोरोनामुक्त होणा-यांचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर आता तुलनेने कमी संख्येने लोक संक्रमित होत आहेत. भारतामध्ये सलग 11 व्या दिवशी संक्रमित लोकांचा आकडा 10 लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या 11 दिवसांत संक्रमणाची साखळी तोडण्यात भारताला यश आले आहे.

देशात आज 9,42,217 जणांना कोरोनाची बाधा झाली.

कोविड रूग्णांच्या बरे होण्याच्या आकडेवारीमध्ये दररोज वाढ दिसून येत आहे. तसेच भारतामध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एका नियमित दराने सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 78,877 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण निरंतर वाढत असून ते आता 83.70 टक्के झाले आहे.

भारतातले आज एकूण 53,52,078 रूग्ण पूर्ण बरे झाले. गेल्या 12 दिवसांमध्ये 10 लाख रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगामध्ये जास्तीत जास्त कोविड रूग्ण बरे होणा-या देशांपैकी भारत एक असून, देशाचे हे स्थान कायम आहे.

भारतामध्ये कोविड संक्रमित रूग्णांपैकी 76.62 टक्के रूग्ण हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.

कोरोनाबाधितांच्या ताज्या आकडेवारीनुसार  सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात अडीच लाखांपेक्षा संक्रमित रूग्ण आहेत. त्या खालोखाल कर्नाटकमध्ये एक लाखांपेक्षा जास्त कोविड-19 चे रूग्ण आहेत.

14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 5,000पेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्याचे दिसून आले आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशात आणखी 81,484 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या नवीन रूग्णांपैकी 78.07 टक्के रूग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रातल्या 16,000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर कर्नाटकातल्या जवळपास 10,000 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या खालोखाल केरळमधल्या 8,000 जणांना कोरोना झाला आहे.

कोरोना आजारातून नव्याने मुक्त झालेल्या रूग्णांपैकी 72 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संख्येने कोरोनामुक्त झालेले लोक आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील रूग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशातल्या 1,095 जणांना कोरोना आजारामुळे प्राण गमवावे लागले.

यामध्ये 83.37 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रामध्ये काल 394 कोरोनाबाधितांचे निधन झाले. हे प्रमाण 36 टक्के आहे. तर त्याखालोखाल कर्नाटकातल्या 130 जणांचे कोरोनामुळे निधन झाले.