विद्यापीठ विकसित रब्‍बी ज्‍वारीच्‍या बियाण्‍याचे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत ज्‍वार सुधार प्रकल्‍पांतर्गत दिनांक १ ऑक्‍टोबर रोजी मौजे नांदापुर येथील निवडक ४० शेतकरी बांधवाना आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिकाचे रब्‍बी ज्‍वारीचे बियाणे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रकल्‍पाचे प्रभारी अधिकार डॉ के आर कांबळे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन श्री बापुसाहेब रसाळ, तंटामुक्‍ती मोर्चा अध्‍यक्ष श्री माणिकराव दळवी, प्रगतशील शेतकरी गुलाबराव रसाळ, डॉ तात्‍यासाहेब रसाळ आदीची प्रमुख उपस्थिती होती. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते रबी ज्‍वारीचे विद्यापीठ विकसित परभणी सुपर मोती बियाणे निवड शेतक-यांना प्रात्‍यक्षिकाकरिता वाटप करण्‍यात आले.

यावेळी मार्गदर्शनात डॉ वासकर म्‍हणाले की, ज्‍वारी पिकाची लागवड केल्‍यास मनुष्‍यास संतुलित आहाराकरिता ज्‍वारीचे उत्‍पादन मिळते, तर जनावरांकरिता कडबाचेही उत्‍पादन मिळते. खरिप हंगामाकरिता विद्यापीठ विकसित परभणी शक्‍ती हे वाण अधिक लोह व झिंक युक्‍त आहे तर रब्‍बी हंगामाकरिता परभणी सुपर मोती हे ज्‍वारी व कडब्‍या करिता चांगला वाण असुन कोरडवाहु लागवडीतही शाश्‍वत उत्‍पादन मिळु शकते. रबी हंगामाकरिता शेतकरी बांधवानी परभणी सुपर मोती वाणाची लागवड करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

डॉ के आर कांबळे यांनी ज्‍वार लागवडीबाबत माहिती देऊन शेतक-यांच्‍या ज्‍वार लागवडीबाबतच्‍या शंकांचे निरासन केले. प्रास्‍ताविक ज्‍वार पैदासकार डॉ एल एन जावळे यांनी केले. सुत्रसंचालन ज्‍वार कृषिविद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे यांनी केले तर आभार डॉ व्‍ही एम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास गांवातील शेतकरी बांधव उपस्थित होते.