“ मी अवयव दानाची शपथ घेतलीय, मी या पवित्र कार्याचे प्रतीक असलेली हिरवी रिबीन लावलीय ” असे ट्विक्ट करून महानायक अमिताभ बच्चन यांनी अवयव दानाचा निर्णय घेवून एका महान, पवित्र कार्यात आपला सक्रिय सहभाग दिलाय ही अत्यंत, प्रशंसनीय, अनुकरणीय बाब आहे. विविध अवयवांच्या प्राप्तीसाठी कितीतरी गरजू जीव आज प्रतीक्षेत आहेत, नवजीवनाची वाट पहाताहेत.
मात्र अवयवदान संदर्भात नागरिकांमध्ये हळू हळू समज – गैरसमज कमी होत असले, लोकांमध्ये सकारात्मकता दिसत असली तरी त्याचे प्रमाण गरजवंतांच्या मानाने कितीतरी अल्प आहे. आजही आपण पाहिजे तेवढे जनमानसात पोहचू शकलेलो नाही कींबहुना याबाबत प्रचार, प्रसार जेवढा व्हावा तेवढा होत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि म्हणूनच जेंव्हा महानायक अमिताभ बच्चन अवयव दानाचा संकल्प करतात तेंव्हा तो लक्षणीय वाटतो.
त्यांच्या प्रमाणे अन्य विविध क्षेत्रातील, स्तरातील मोठ्या मान्यवर व्यक्ति, सेलिब्रिटी, स्वत:हून या कार्यात सहभागी होतील तेंव्हा ही चळवळ खर्या अर्थाने अधिकाधिक गतिमान होण्यास मदत होईल अस म्हटल्यास वावगे होणार नाही.
-विश्वनाथ पंडित, ठाणे