गेल्या काही वर्षात केळीवर सीगाटोका (करपा, banana sigatoka) रोग मोठया प्रमाणावर येत असुन केळीची लागवड संकटात सापडण्याची संभावना आहे. या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. या रोगामुळे केळीची प्रत कमी झाल्याने उत्पादन व आर्थिक बाबींवर प्रतिकुल परिणाम होत आहे. हा रोग बुरशीजन्य असुन बुरशीच्या अलैगींक अवस्थेस सरकोस्पोरा म्युसी तर लैगींक अवस्थेत मायस्कोस्पेरीला म्युसीकोला असे नाव आहे. हा रोग जगातील उष्ण कटिबंधातील केळी पिकविणा-या सर्व देशात येतो.
रोगाची लक्षणे
१. प्रथम पानावर लहान पिवळे ठिपके येतात.
२. हे पिवळे ठिपके ३ ते ४ मि. मी. लांब व १ मि. मी रुंद आकाराचे होतात.
३. असे लांबट झालेले ठिपके कालांतराने रंगाने तपकिरी, काळे होऊन वाढतात व लांबट गोलाकार होतात. पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांची लांबी १२ ते १५ मि. मी. आणि रुंदी २.५ ते ३. मि. मी. एवढी असते.
४. पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्याभोवती पिवळी वलये तयार होतात.
५. शेवटी ठिपके मध्य भागापासुन राखी रंगाचे होऊन त्यांच्या कडाच फक्त काळपट राहतात.
६. ठिपक्यांची संख्या जास्त असेल तर ती वेगवेगळी ओळखता येत नाहीत आणि अशी रोगग्रस्त पान फाटतात, करपतात व झाडावर देठापासुन मोडुन लोंबकळतात.
७. रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर, तीव्र असेल तर केळी भरत नाहीत. अपरिपक्व पिकतात आणि घडातुन गळु लागतात. अपरिपक्व पिकलेल्या फळाचा गर पिवळसर होतो व त्याची चव तुरट बनते.
रोगाचा प्रसार
१. हया रोगाचा प्राथमिक प्रसार हवेव्दारे लैगिंक बिजाणुंमुळे होतो.
२. अलैगींक बिजाणु पावसाचे थेंब व जोराचा वारा यामुळे पसरतात व दुय्यम प्रसारास कारणीभुत होतात.
हवामान : हया बुरशीच्या वाढीस उष्ण व आर्द्रतायुक्त हवामान अतिशय अनुकूल आहे. पावसाळयात अधुनमधून पाऊस व ढगाळ हवामान असते. त्यामुळे हया रोगाचा प्रादुर्भाव / उद्रेक पावसाळयातच जास्त होतो. थंडी वाढल्यावर हया रोगाची लागण व वाढ थांबते.
रोगाचे व्यवस्थापन
हा रोग एकात्मिक रोग नियंत्रण तंत्राच्या अवलंबनाने नियंत्रित होऊ शकतो. मशागतीत योग्य फेरपालट, रोगग्रस्त पानाचा नाश व योग्य बुरशीनाशकाचा वापर केल्याने रोगाचे व्यवस्थापन करता येऊ शकते.
अ. मशागत
१. केळीची लागवढ ओढे, नदी नाले यांच्या काठावरील शेतात आणि चिबड जमिनीत करु नये.
२. केळीची लागवड शक्यतो मे महिन्याच्या शेवटचा आठवडा किंवा जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवाढयातच करावी.
३ लागवडीसाठीचे कंद ७५० ग्रॅम ते १ किलो वजनाचे शंकु आकाराचे, ३ ते ४ महिने वयाचे, ज्यांची पाने तलवारीच्या पात्यासारखी अरुंद असतील अशाच मुनव्यापासुन घ्यावीत.
४. लागवडीपुर्वी कंद कार्बेन्डॅझिमच्या ०.१ टक्के द्रावणात अर्धा तार्स बुडवावेत.
५. नत्रयुक्त खताच्या मात्रा अधिक प्रमाणात व सहा महिन्यांनतर देऊ नयेत.
६. लागवडीनंतर मुनवे वेळोवेळी काढुन बाग तणरहित ठेवावी.
७. पिकाचा फेरपालट करावी आणि शक्यतोवर खोडवा घेणे टाळावे.
८. जास्तीचे पाणी निचरुन जाण्यासाठी बागेत चा-या कराव्यात.
ब. रोगग्रस्त पानांचा नाश
रोगाची प्राथमिक लक्षणे म्हणजेच बारीक तपकिरी ठिपके, पानांवर दिसु लागताच पाने काढुन नष्ट करावीत.
क. लागवडीचा कालावधी
केळी लागवडीचा कालावधी साधारणत: जुन व ऑक्टोंबर असा आहे. जुन लागवडीतील केळी दोन वेळा पावसात सापडतात त्यामुळे जुन लागवडीतील बागांवर रोग जास्त प्रमाणात दिसुन येतो. जर केळी बागेची लागवड मे महिन्यात केली तर केळी मार्च – एप्रिलमध्ये काढण्यास येतात व केळी फक्त बाल्यावस्थेत पावसात सापडुन रोगास बळी पडतात त्यामुळे रोग नियंत्रणाचा खर्च ब-याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
ड. बुरशीनाशकाचा वापर
रोगाची लागण बाल्यावस्थेत होत असल्यमुळे केळी लागवड केल्यावर पहिल्या पावसाळयात त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन रोगाचा प्रादुर्भावच केळी काढण्याचे वेळी होणार नाही. पीक एक ते सव्वा महिन्याचे झाल्यावर किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसु लागताच बुरशीनाशकाच्या फवारण्या सुरु कराव्यात.
बुरशीनाशकाच्या फवारण्याचे वेळापत्रक पुढे दिलेले आहे.
लागवडीनंतर दिवसांनी | औषधाचे प्रमाण / तीव्रता | पाणी (लि./हे) | बुरशीनाशक (ग्रॅम) | |
३५-४० | बोर्डोमिश्रण (१ टक्के) किंवा | १०० | १ कि. मोरचुद + १ कि. चुना | |
कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२ टक्के) | ३०० ग्रॅम | |||
५५-६० | कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२ टक्के) | १५० | ३०० ग्रॅम | |
७०-७५ | कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२ टक्के) किंवा कार्बेन्डॅझिमच्या (०.१ टक्के) | २०० | ४०० ग्रॅम
२०० ग्रॅम |
|
८५-९० | कार्बेन्डॅझिमच्या (०.१ टक्के) किंवा
मँकोझेब (०.२ टक्के) |
२५० | २५० ग्रॅम
५०० ग्रॅम |
|
१००-१०५ | कार्बेन्डॅझिमच्या (०.१ टक्के) किंवा
मँकोझेब (०.२ टक्के) |
४०० | ४०० ग्रॅम
८०० ग्रॅम |
|
१२०-१२५ | कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.२ टक्के) किंवा मँकोझेब (०.२ टक्के) | ५०० | १००० ग्रॅम |
सुचना :
१. सदरील पाणी व औषधाचे प्रमाण हे साध्या फवारणीच्या पंपसाठी आहे. पॉवरस्पेअरचा उपयोग केल्यास औषधाचे प्रमाण तिप्पट करावे.
२. प्रत्येक फवारणीच्या वेळेस औषध पानावर चिटकुन राहण्यासाठी सँडोव्हीट (प्रति दहा लिटर पाण्यात १० मि.लि.) किंवा गुळाचे पाणी किंवा डिंकाचे पाणी द्रावणात मिसळावे. ३. पुढील वर्षी पुन्हा पावसाळयात सदरील रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास वरील बुरशीनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
(संदर्भ – कृषि दैनंदिनी 2016, वनामकृवि, परभणी पान क्रं – 247-249)