ज्वालामुखींच्या उद्रेकाची मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी मदत

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर भारतातील मौसमी पावसाचा अंदाज जास्त चांगल्या पद्धतीने लावता येऊ शकतो : भारतीय-जर्मन संशोधन पथक

भारतातील शेतीसाठी आणि पर्यायाने एक अब्ज लोकांच्या अन्नाचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या मौसमी पावसाचा म्हणजेच मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी मोठ्या ज्वालामुखींच्या उद्रेकाची मदत होऊ शकते. ज्वालामुखींच्या उद्रेकाचा अंदाज घेता येत नसला  तरी त्यामुळे मान्सूनचा अंदाज मात्र अधिक अचूकपणे वर्तवता येऊ शकेल असे मत भारतीय – जर्मन संशोधकांच्या पथकाने वर्तविले आहे.

हे विधान विरोधाभासाने भरलेले असले तरीही, दक्षिण आणि आग्नेय आशियामधील मोठ्या भागावर पडणारा मान्सून आणि ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर होणारा “अल-निनो” परिणाम यांच्यातील दृढ संबंधांमुळे असे होते हे दिसून येते. हवामानशास्त्र संस्थांची निरीक्षणे, हवामानाच्या नोंदी, संगणकाच्या सहाय्याने घेतलेल्या नोंदी तसेच गेल्या सहस्त्रकात पृथ्वीवर असलेले झाडांचे अवशेष, प्रवाळ, गुहांमधील अवशेष आणि बर्फात गाडले गेलेले अवशेष इत्यादी हवामानशास्त्र संबंधी पुराणकालीन नोंदी या सर्वांतून मिळालेल्या माहितीचे पृथक्करण केल्यानंतर संशोधकांच्या असे लक्षात आले की मान्सून आणि हवामानात सर्वात जास्त चंचलता आणणारा “अल-निनो” परिणाम यांचे एकत्रीकरण केल्यानंतर भारतीय उपखंडातील मौसमी पावसाच्या क्षमतेचा अंदाज करणे सोपे झाले आहे.

या संशोधनातून हाती आलेल्या काही निष्कर्षांमुळे भविष्यातील हवामानविषयक अंदाज बांधणीच्या विकासाला मदत होऊ शकते तसेच अनेक भू-अभियांत्रिकी प्रयोगांच्या प्रादेशिक परिणामांचा अभ्यास करायला मदत होऊ शकते. मानवनिर्मित हरितवायू उत्सर्जनामुळे होत असलेल्या जागतिक उष्णतावाढीचा परिमाण कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी सौर उत्सर्जन व्यवस्थापनाचा मार्ग सुचविला आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी वरच्या भागात धुलीकणांचे आच्छादन पसरवून पृथ्वीचा पृष्ठभाग तापविणाऱ्या सूर्यकिरणांचा काही भाग रोखून धरायचा अशी योजना आहे. ही प्रक्रिया ज्वालामुखीनंतर वातावरणात पसरणाऱ्या धूळ-राखेच्या आच्छादनासारखीच आहे. मात्र कृत्रिमपणे सुर्यकिरण अडविल्यामुळे वातावरणातील अनेक नैसर्गिक प्रक्रियांवर काही धोकादायक परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून त्या प्रयोगाचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

संशोधकांनी याबाबत काढलेले निष्कर्ष “सायन्स अॅडव्हान्सेस” मध्ये “फिंगरप्रिंट ऑफ व्होल्कॅनिक फोर्सिंग ऑन द ईएनएसओ- इंडियन मॉन्सून कपलिंग” या शीर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आले आहेत. हा लेख इथे वाचता येईल.

या संशोधनाच्या अधिक माहितीसाठी कृपया डॉ.आर.कृष्णन, विशेष कार्यकारी संचालक सीसीसीआर- आयआयटीएम तसेच संशोधनपर लेखाचे लेखक यांच्याशी krish@tropmet.res.in या ईमेल आयडी वर किंवा 020-25904301 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.