दुधाची प्रत दुधातील स्निग्धांश व स्निग्धांश विरहित घनपदार्थ (एस.एन.एफ.) या दोन घटकांवर ठरविली जाते. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण ही आनुवंशिक बाब असली, तरी शास्त्रोक्त पद्धतीने दुधाळ जनावरांचे संगोपन केल्यास, व्यवस्थापनातील बारीक सारीक त्रुटी/चुका कटाक्षाने टाळल्या, तर निश्चितच दुधातील स्निग्धांश ठराविक स्तरापर्यंत आपण वाढवू शकतो.
• दुधातील स्निग्धांश (फॅट) वाढविण्याचे उपाय :
१) दोन धारांतील अंतर नेहमी समान ठेवावे, जेथे दिवसातून दोन वेळा दूध काढले जाते, तेथे दोन धारांतील अंतर १२ तासांचे असावे.
२) ज्या गाई, म्हशींपासून जास्त दूध उत्पादन मिळते, त्यांची दिवसातून तीन वेळा धार काढावी व त्यांच्या प्रत्येक धारेतील (पिळाईतील) वेळ बरोबर आठ तासाची असावी.
३) गाई, म्हशींची धार घाईघाईने काढल्याने, गाई, म्हशींच्या कासेतील दूध पूर्णपणे काढले जात नाही व दुधातील स्निग्धांश कमी होतो. त्यामुळे गाई, म्हशींचे दूध पूर्णपणे काढावे. दूध काढण्याची प्रक्रिया ५ ते ७ मिनिटांत पूर्ण करावी.
४) जेथे वासरू गाईला पाजले जाते, तेथे वासरास प्रथम पाजावे. शेवटचे दूध, दुधाच्या भांड्यात घ्यावे किंवा वासरांना त्यांच्या वजनाच्या १० टक्के प्रमाणात दूध वरून पाजण्याची पद्धत अवलंबावी.
५) दुधाळ जनावरांना स्तनदाह, दगडी झाल्यामुळे त्या जनावराच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दुधाळ जनावरांना स्तनदाह रोग होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करावी. यामध्ये दर पंधरा दिवसाला सीएमटी टेस्ट करावी तसेच दूध काढण्यापूर्वी पोटॅशिअम परमँगनेटच्या ०.१% द्रावणाने कास व सड धूवावेत व धार काढल्यानंतर सडाच्या निर्जंतूकीकरणासाठी साफ किट स्प्रे रोज सडांवर मारावा. तसेच गाय धार काढल्यानंतर पाऊन तास खाली बसणार नाही याची काळजी घ्यावी. गाय, म्हैस आटवत असताना त्यांच्या सडात अँटिबायोटिक ट्यूब्ज सोडाव्यात. एखादे काळे झिरझिरीत फडके घेऊन पसरट भांड्यावर ताणून बांधावे, धार काढताना प्रत्येक सडाच्या पहिल्या दोन धारा वेगवेगळ्या ठिकाणी फडक्यावर काढाव्यात, दुधात गाठी अथवा रक्तपेशी आढळल्यास ताबडतोब उपचार करावा. धारा काढताना कासेतील दूध पूर्णपणे काढावे.
६) गाई, म्हशीची धार काढताना, त्यांना व्यवस्थित पान्हवावे. धारा काढताना जनावरास डास, माश्या चावणार नाहीत याची काळजी घ्यावी. गाय, म्हैस पान्हा चोरणार नाहीत याची काळजी घ्यावी.
७) दुधाळ जनावरांना संतुलित आहार योग्य प्रमाणात दिला पाहिजे. यामध्ये आंबोण, हिरवा चारा व सुका चारा योग्य प्रमाणात दिला पाहिजे. हिरव्या चाऱ्याबरोबरच वाळलेला (सुका) चारा दुधातील स्निग्धांश वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे सुका चारा योग्य प्रमाणात दिलाच पाहिजे.
८) दुभत्या जनावरांना जास्त प्रमाणात ऊस खाऊ घालू नये, त्यामुळे दुधातील स्निग्धांश कमी होतो व तसेच जास्त प्रमाणात ऊस खाऊ घातल्यास गाय लवकर गाभण राहात नाही.
९) आहारातून हिरवा चारा सकाळी ९ ते दुपारी जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत द्यावा. त्यानंतर दुधाळ जनावरास वाळलेला चारा द्यावा, त्यामुळे सकाळी दुधातील स्निग्धांश वाढतो. वाळलेली वैरण देताना कुट्टी करून द्यावी, या कुट्टीचे तुकडे दीड इंचापेक्षा मोठे होत गेल्यास हळूहळू दूध उत्पादन कमी होत जाते, जर हे तुकडे ०.७५ इंचापेक्षा लहान झाल्यास स्निग्धांश कमी होतो; वैरणीची कुट्टी करताना सव्वा ते दीड इंचाचे तुकडे करावेत. त्यामुळे दूध उत्पादन वाढते व दुधातील स्निग्धांश देखील वाढतो.
१०) वाहतुकीत दूध हिंदकळले गेल्यास, दुधातील स्निग्ध कण किटलीच्या/ कॅनच्या झाकणास चिकटून वाया जातात, असे स्निग्ध कण पुसून ते दुधात टाकावेत म्हणजे दुधातील स्निग्धांश कमी होणार नाहीत.
११) दुधाळ जनावरांना त्यांच्या आहारात ४० ते ५० ग्रॅम (काडीपेटीचे टोपण भरून) क्षार मिश्रण (अँग्रीमीन फोर्ट,लायकामीन, न्यट्रीसॅक पावडर इ.) दिले पाहिजे. ज्या गाई १८-२० लीटरपेक्षा जास्त दूध देतात, अशा जनावरांना १०० ग्रॅम मिनरल मिक्श्चर द्यावे. दूधाळ गाईंसाठी शक्यतो पशुआहारतज्ञ किंवा पशूवैद्यकीय अधिकार्याचा सल्ला घेणे कधीही योग्य असते.
१२) हिरवा चारा देताना एक दल (मका, ज्वारी, बाजरी, हत्तीघास (फूले जयवंत), मारवेल, इ.- ६० % व द्विदल (लूसर्न, बरसीम, चवळी इ.- ४० %) चाऱ्याचे समतोल प्रमाण असावे.
- डॉ. आर. एस. जाधव, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती