औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्रात महिला शेतकरी प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान व इफको यांच्या संयुक्त विदयमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व राष्ट्रीय पोषण माह – २०२० याचे औचित्य साधून महिला शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन 16 सप्‍टेबर रोजी करण्‍यात आले होते.  अध्‍यक्षस्‍थानी राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ. सुर्यकांत पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्‍या महिला व बालविकास विभागाच्या सभापती मा. सौ. अनुराधाताई चव्हाण या उपस्थिती होत्‍या तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी  महिला व बालविकास श्री प्रसाद मिरकले, इफको, औरंगाबाद क्षेत्र प्रबंधक श्री अनिल कुलकर्णी, गंगापुरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. कोमल कोरे, मा. रामेश्वर ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. सुर्यकांत पवार म्‍हणाले की, बदल्या पीकपध्दतीमुळे खादय संस्कृतीही बदलली असुन आजच्या जीवनशैलीत प्रत्येकांनी रोग प्रतिकारकशक्ती वाढीकरिता प्रयत्‍न करावेत. जैवसमृध्द पिकांचे आहारात समावेश असणे गरजेचे आहे. विविध पिकांचे आरोग्यविषयक गुणधर्म लक्षात घेवून जैवसमृध्द असणा-या बाजरी, ज्वारी तीळ, मटकी, करडई, नाचणी, भगर, राळे आदी पिकांची लागवड करावी. यामुळे पोषक आहार मिळेल व त्याचा उपयोग सुदृढ आरोग्यासाठी होईल. परभणी कृषि विद्यापीठ विकसित जैवसमृध्‍द लोहाचे प्रमाण जास्‍त असणारे वाजरीचा वाण एएचबी १२०० व एएचबी १२६९ तसेच ज्वारीचा परभणी शक्ती या वाणाचा लागवडी करिता आवश्‍य वापर करावा, असे ते म्‍हणाले.

मा. सौ. अनुराधाताई चव्हाण मार्गदर्शनात म्हणाल्या की, शेतीच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्‍य सुदृढ करायचे असेल तर महिलेने आरोग्यविषयक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. पोषणबाग ही काळाची गरज असुन या पोषणबाग लागवडीचे प्रशिक्षण घ्‍यावे. औरंगाबाद जिल्हयात कुपोषणमुक्त करिता पोषणबाग लागवडीसाठी मोठया प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील शेतक-यांच्या विकासामध्ये औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र च्या कार्याचेही कौतुक करून दत्तक गावात झालेल्या विकासात शेतकरी समाधानी असल्याचे सांगितले.

इफकोचे क्षेत्र प्रबंधक श्री कुलकर्णी यांनी शेतक-यांत इफकोच्या विविध कार्या विषयी सविस्तर माहिती दिली.तसेच येणा-या काही दिवसात लिक्विड युरिया ५०० मिलीची बॉटल उपलब्ध होणार असल्याचीही माहिती देऊन इफकोच्या खतांच्या खरेदीवर शेतक-यांना इफकोमार्फत अपघाती विमाही दिला जातो, असेही त्यांनी सांगितले. प्रा. गीता यादव यांनी संतुलित आणि चौरस आहाराविषयी विशेष मार्गदर्शनात म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जीवनशैलीत संतुलित आणि चौरस आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. फास्ट फुडचा वापर कमी करुन सकस आहार घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तींनी आपल्या वजनाची पडताळणी करणे महत्वाचे आहे व त्यानुसार वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषणयुक्त थालीचा आपल्या आहारात अवलंब करणे गरजेचे  असल्‍याचे त्यांनी सांगितले. तर उदयानविदया विषय विशेषज्ञ डॉ. दर्शना भुजबळ म्हणाल्या की, घरालगत असणा-या मोकळया जागेत कुटुंबाची गरज भागविण्यासाठी ताज्या व रसायन मुक्त भाजीपाला पिकांची लागवड परसबागेत केली जाते. यात घरातील सांडपाणी , काडीकचरा व इतर पदार्थांचा सेंद्रीय खत म्हणून वापर करुन अत्यंत पोषक भाजीपाल्याची निर्मिती करता येते.

कार्यक्रमात.ऑनलाईन रब्बी शेतकरी मेळाव्यात कुलगुरु  मा डॉ. अशोक ढवण यांचे भाषणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी केले, विषय विशेषज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. अनिता जितूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अशोक निर्वळ, श्री इरफान शेख, श्री शिवा काजळे, श्री लक्ष्मण शिंदे व कृषि विज्ञान केंद्रातील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमात एकुण ८४ अंगणवाडी सेविका, महिला शेतकरी व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पोषणबाग निर्मितीसाठी इफकोव्दारे देण्यात आलेल्या भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.