विविध राज्यांतील पोटनिवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडली. सध्या, विधानसभा/लोकसभा मतदारसंघातील 65 जागा रिक्त आहेत, यापैकी 64 जागा विधानसभेच्या आहेत आणि एक जागा लोकसभा मतदारसंघातील आहे.
निवडणूक आयोगाने अहवालांचा आढावा घेतला तसेच विविध राज्यांच्या मुख्य सचिव/ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काही राज्यांमधील पूरस्थिती आणि महामारीची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याविषयी सांगितले होते, त्याविषयी माहिती घेतली.
बिहार विधानसभा निवडणूक प्रक्रिया 29 नोव्हेंबर 2020 पूर्वी पार पडणे आवश्यक आहे, हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच 65 जागांसाठी पोटनिवडणूक एकत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका एकत्र घेतल्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, कायदा आणि सुव्यवस्था राखणारी इतर दले आणि इतर पूरक बाबींची वाहतूक सुलभ होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणूक आणि बाकीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून योग्य वेळी जाहीर केला जाईल.