खाजगी वने, पुनर्स्थापित शेतजमिनींना तारेचे कुंपण करता येणार

मुंबई दि. 3 : – महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 च्या कलम 22 (अ) अंतर्गत पुनर्स्थापित शेतजमिनींना तारेचे व जाळीचे कुंपण उभे करण्यास वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

खाजगी वन म्हणून संपादित केलेले क्षेत्र संबंधित खातेदारास त्याच्या उपजीविकेसाठी महाराष्ट्र खाजगी वने संपादन अधिनियम 1975 च्या कलम 22 (अ) अंतर्गत पुनर्स्थापित करण्याची तरतूद आहे. सदर क्षेत्रावर शेतीविषयक कामे करण्यास कोणतेही बंधन नव्हते. मात्र अशा जमिनीचा अकृषक व वनेतर वापर करावयाचा झाल्यास वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

शेत पिके व शेतातील झाडोरा यांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून  वन अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा होत होती.त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहितीही मंत्री श्री. राठोड यांनी दिली.