कृषी संस्था विद्यार्थ्यांना नवीन संधी प्रदान करतील; शेतीला संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञानासह जोडण्यास मदत करतील: पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील झांसी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयीन व प्रशासन इमारतींचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आत्मनिर्भर भारत अभियानात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले की उत्पादक आणि उद्योजक म्हणून शेतकर्यांनी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता संपादन केली पाहिजे. पंतप्रधान म्हणाले की या अनुषंगाने अनेक ऐतिहासिक कृषी सुधारणा करण्यात आल्या आहेत. इतर उद्योगांप्रमाणेच आता शेतकरी देखील जिथे त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल तिथे देशात कोठेही आपल्या शेतमालाची विक्री करु शकतात. ते म्हणाले की संकुल आधारित पध्दतीमध्ये चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा विशेष समर्पित निधी स्थापित करण्यात आला आहे.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी स्थिर प्रयत्न सुरू
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी स्थिर प्रयत्न सुरू असल्याचे सांगून पंतप्रधानांनी नमूद केले की संशोधन संस्था व कृषी विद्यापीठांची यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते म्हणाले की, मागील 6 वर्षात देशात केवळ एकच केंद्रीय कृषी विद्यापीठ होते परंतु आता देशात तीन केंद्रीय कृषी विद्यापीठे आहेत. या व्यतिरिक्त, आयएआरआय झारखंड, आयएआरआय आसाम आणि बिहारमधील मोतिहारी येथे महात्मा गांधी इंस्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड फार्मिंग सारख्या आणखी तीन राष्ट्रीय संस्था स्थापन केल्या जात आहेत. या संस्था विद्यार्थ्यांना नवीन संधीच प्रदान करणार नाहीत तर त्यांची क्षमता वृद्धिंगत करण्यात तसेच स्थानिक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्यास मदत करतील असेही ते म्हणाले.
शेतीशी निगडित आव्हाने दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे केला जातो याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या टोळ धाडीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की टोळधाड रोखण्यासाठी व नुकसान कमी करण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम केले. अनेक शहरांमध्ये कित्येक नियंत्रण कक्ष स्थपन करण्यात आले, शेतकऱ्यांना सावध करण्याची व्यवस्था करण्यात आली, फवारणीसाठी ड्रोन, टोळांना ठार करण्यासाठी वापरण्यात येणारी आधुनिक फवारणी यंत्र खरेदी करून शेतकर्यांना पुरविली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सहा वर्षात सरकारने संशोधन आणि शेतीदरम्यान एक संबंध स्थापित करण्यासाठी आणि खेड्यांमधील स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना वैज्ञानिक सल्ला देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विद्यापीठातील ज्ञान आणि तज्ञांचा प्रवाह शेतापर्यंत वाढविण्यासाठी पर्यावरणशास्त्र विकसित करण्यासाठी विद्यापीठांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.
शालेय स्तरावर कृषी ज्ञानाची आवश्यकता व त्यावरील व्यावहारिक वापरावर भर देत पंतप्रधान म्हणाले की खेड्यांमध्ये माध्यमिक स्तरावर कृषी विषय सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे दोन फायदे होतील – एक, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीशी संबंधित समज विकसित होईल आणि दुसरे म्हणजे, विद्यार्थी आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेती, आधुनिक शेती तंत्र आणि विपणन याबद्दल माहिती देऊ शकेल. यामुळे देशातील कृषी-उद्योजकतेला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ झाशी येथे असून बुंदेलखंडातील एक प्रमुख संस्था आहे. विद्यापीठाने 2014-15 मध्ये पहिले शैक्षणिक सत्र सुरू केले आणि कृषी, फलोत्पादन आणि वनीकरण या विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
मुख्य इमारती तयार होत असल्यामुळे सध्या हे विद्यापीठ झाशी येथील ग्रासलँड अँड फॉडर रिसर्च इन्स्टिट्यूट येथून कार्यरत आहे.