रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपे-कलम यातील अंतर सुधारित करण्यास परवानगी
मुंबई, दि. २९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेतील रोपे-कलम यातील अंतर सुधारित करण्यास फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.
श्री.भुमरे म्हणाले, अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असल्याने कलमे – रोपे यामधील अंतर कमी-जास्त करण्यास क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्रातील हवामान व जमिनीच्या मगदुराप्रमाणे राज्यात विविध फळपिकांची वेगवेगळ्या अंतरावरील लागवडी करिता शिफारस केलेली आहे. सद्य:स्थितीत या फळपिकांच्या लागवडीमध्ये असलेले अंतर विचारात घेतले असता सदर अंतरामुळे २ झाडांमधील जास्तींची जागा अनेक वर्षे विनावापर पडून राहते. लागवडीनंतर सुरुवातीच्या ५ ते ७ वर्षाच्या कालावधीत या जागेचा पूर्णपणे वापर होत नाही, तसेच झाडांची संख्या कमी असल्याने हेक्टरी उत्पादन देखील कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक फायदा त्याप्रमाणात होत नाही.
कृषी विद्यापिठांनी शिफारस केल्यानुसार कमी अंतरावर लागवड केल्यास झाडांच्या संख्येत वाढ तसेच हेक्टरी उत्पादनात वाढ होऊन कमी अंतरावर लागवड केल्यास झाडांच्या संख्येत वाढ तसेच हेक्टरी उत्पादनात वाढ होऊन लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यात फळबाग लागवडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असल्याने राज्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्याकरिता या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री श्री.भुमरे यांनी यावेळी सांगितले.