पुळ्याचा गणपती –
रत्नागिरी शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत गणपतीपुळे हे स्थान आहे। मुद्गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे। देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्चिम द्वारदेवता आहे. अष्टविनायकांखेरीज जी काही जागृत गणेश मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यांच्यात पुळ्याच्या गणपती मंदिराचा समावेश होतो. इ.स. १६०० मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले होते. तसेच माधवराव पेशवे आणि रमाबाई यांनी येथे धर्मशाळा बांधली. येथील वैशिष्ट्य हेच की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे तिलाच गणेशस्वरूप समजले जाते. त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो. खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते.
गुहागरचा उरफाटा गणपती।
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गुहागर येथे ही गणेशमूर्ती आहे। ही मूर्ती कोळीलोकांना समुद्रात सापडल्याचे सांगतात। एकदा समुद्राच्या पाण्यामुळे गुहागर बुडण्याची वेळ आल्यावर या गणेशाला संकटनिवारणासाठी लोकांनी प्रार्थना केली. तेव्हा पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती पश्चिमाभिमुख झाली आणि समुद्र मागे हटला. तेव्हापासून या गणेशाला “उरफाटा’ गणपती हे नाव पडले. सुमारे ३०० वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाली.
विनायक गावचा सिद्धिविनायक
रायगड जिल्ह्यातील उरण जवळ विनायक नावाचे छोटेसे गाव आहे। तिथेच या सिद्धिविनायकाचे स्थान आहे। हे मंदिर हंबीरराज राजाच्या काळचे, सुमारे सातशे- आठशे वर्षाचे प्राचीन मंदिर आहे. येथील सिद्धिविनायकाची मूर्ती साडेतीन ते चार फूट उंचीची असून त्याच्या दोन्ही बाजूस ऋद्धिसिद्धिच्या मूर्ती विराजमान आहेत.
मुरुडचा बल्लाळ विनायक
रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिऱ्याजवळ बल्लाळ विनायकाचे स्थान आहे। जंजिऱ्यापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर हा गणेश भक्तांसाठी विराजमान झालेला आहे। या गणेशाचे वैशिष्ट्य असे की अष्टविनायकांपैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर पूर्वी याच स्थानी होता. परंतु मुघल मूर्तीभंजकांच्या भीतीने त्याला येथून पालीला हलविण्यात आले होते. तथापि श्री बल्लाळ विनायकाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी १९०३ मध्ये गणेश भक्तांनी याच जागी एक पाषाणमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर १९०९ मध्ये संगमरवरी मूर्तीसह मंदिर बांधण्यात आले. पूर्वीच्या स्थानमाहात्म्यामुळे असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात.
दिवेआगरचा सुवर्ण गणपती श्रीवर्धन तालुक्याच्या मध्यभागी अरबी समुद्रकिनाऱ्यालगत दिवे आगर गाव वसलेले आहे। प्राचीन काळी या ठिकाणी मौर्य व शिलाहार यांचे राज्य होते। त्याकाळी अरब आणि पोर्तुगीज यांचे या परिसरात समुद्रमार्गाने हल्ले होत असत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून हजार वर्षांपूर्वी दिवेआगरची सुवर्ण गणेशाची मूर्ती जमिनीखाली पुरून ठेवली होती. दरम्यान १९९७ साली एका संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेत खोदकाम करताना ही मूर्ती आढळली. त्यानंतर या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांचे लोंढे या ठिकाणी येऊ लागले.
कोकणातील इतर गणेशस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे –
कनकेश्वर, ता। अलिबाग, जि। रायगड येथील रामसिद्धिविनायक; अलिबाग जवळील आवास गावचा वक्रतुंड; खोपोली ते पाली रस्त्यावरील, जांभूळपाडा गावचा श्री दशभुज सिद्धलक्ष्मी गणेश; उरण जवळील चिरनेर गावचा श्री महागणपती; कर्जत तालुक्यातील कडाव गावचा श्री दिगंबर सिद्धिविनायक; अगरगुळे, जि. रत्नागिरी येथील गलबतवाल्यांचा गणपती; चिपळूण तालुक्यातील हेदवीचा दशभुज लक्ष्मीगणेश; दापोली तालुक्यातील आंबोली गणपती आणि आंजर्लेचा कड्यावरचा सिद्धिविनायक; चिपळूण तालुक्यातील परशुराम येथील परशुराम गणेश; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडीचा श्री द्विभुज महागणपती.