हवामान खात्याने सांगितलेला जून पूर्वीचा मॉन्सून खरा होता की १५ आॅगस्ट २०२० सुरू झालेला मॉन्सून खरा? ह्या प्रश्नाची उत्तरे हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली आहेत.
गेल्या २० वर्षापासून वेगाने मान्सून पॅटर्न बदललेला असून मागील पाच वर्षांत त्याच्यातील अत्यंत लक्षणीय बदल आपण प्रत्येक व्यक्ती अनुभवतो आहोत. म्हणून मान्सून व्याख्या बदल आता अत्यंत आवश्यक आहे. तसेच आपले धरण जलव्यवस्थापन व पिक पद्धती यात त्या पावसानुसार नुसार बदल करीत अंदाज नव्हे तर हवामानाची खरी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.
मान्सून
‘मान्सून’ हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’ किंवा ‘हंगाम’ असा होतो. नैर्ऋत्य मोसमी वार्यांना आणि त्यासोबत बरसणार्या पावसाला ‘मान्सून’ हे नाव ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्राप्त झाले. समुद्रावरून येताना हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणतात. अनुकूल स्थितीमध्ये या बाष्पाचे रूपांतर ढगांमध्ये होते. या ढगांना योग्य तो थंडावा मिळाला की ते जलधारा बनून पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो आणि हाच तो ‘मान्सूनचा पाऊस’ होय.
पाऊस ही एक वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. जून-जुलैमध्ये मान्सून हिमालयापर्यंत धडकतो. आपल्या कृषिप्रधान भारत देशाचा जुलै ते ऑक्टोबर असा खरीप हंगाम यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातील बाष्पामुळे आणि ‘ईशान्य मोसमी’ वार्यामुळे ‘रिटर्न म्हणजे परतीचा मान्सून’ पाऊस देतो. या पावसावर ऑक्टोबर ते मार्च असा रब्बी हंगाम पिकतो.
अनेकदा शेतकरी मान्सून पुर्व पावसाला मान्सून समजून नियोजन व पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचे संकट ओढावून आत्महत्या करतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होत आहे. अशा ‘आभासी मान्सून’ पासून सावध रहावे. गेल्या वीस वर्षात वेगाने बदललेल्या मान्सून व वादळांच्या पॅटर्न मुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे. हवामान खात्यातील सकारात्मक बदल, प्रसारमाध्यमांनी घडवून आणलेल्या खुल्या वैज्ञानिक चर्चा व शेतकरी जनतेची लाईव्ह प्रश्नोत्तरे यातूनच कृषी प्रधान भारत देश आत्मनिर्भर होईल.
भारत हवामान विभाग गेल्या १४५ वर्षांपासून शेतकरी व जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचे आगमन पाहून शेतकर्यांच्या शेती कामांचे नियोजन व पेरणीचा निर्णय ठरतो. अचूक हवामान माहितीच्या जोरावर कृषी क्रांती घडली आहे. कृषी प्रधान भारत देशात शेतकऱ्यांना पिकांसाठी मान्सून पाऊस आवश्यक आहे तसेच त्याची खरी माहिती आवश्यक आहे.
यावर्षी निसर्ग वादळामुळे मान्सून लांबणीवर अशी घोषणा झाली. नंतर अवघ्या काही तासांत मान्सून कर्नाटकला पोहोचला ही हवामान खात्याची घोषणा संशयास्पद व शंका निर्माण करणारी ठरते. केरळमधील आठ केंद्रांवर अडीच मिलीमीटर पावसाची नोंद होणे असे निकष वादळी पावसाने केवळ पुर्ण झाले म्हणून आभासी मान्सूनलाच खरा मान्सून असे घोषित करण्यात येत आहे. आणि तो भारतीय शेतीला अतिशय आत्मघातकी ठरू शकतो.
खरा मॉन्सून कसा ओळखावा ?
महाराष्ट्रात १५ आॅगस्ट २०२० पासून मान्सूनचे आगमन झाले असून यापुढे साधारणतः चार महिने म्हणजे १५ डिसेंबर २०२० पर्यंत पाऊस असू शकेल असे माझे एक हवामान अभ्यासक म्हणून वैयक्तिक मत आहे. अर्थात दररोज २१ तास याबाबत निसर्ग समजून लोकांचे जीव वाचविण्यासाठी मी संशोधनात कार्यरत आहे.
मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनचा पाऊस आणि मान्सूनउत्तर पाऊस अशी तीन टप्प्यांत पावसाची वर्गवारी करता येऊ शकते. याशिवाय अचानक येणाऱा अवकाळी पाऊस काय? हे शेतकर्यांनी समजून घेतले पाहिजे. वृत्तपत्रातील बातम्या कधीकधी नव्हे तर अनेकदा शेतकरी आणि सामान्य माणसाच्या मनात गोंधळ निर्माण करतात. म्हणून पावसाला समजून विचार करणे महत्त्वाचे आहे.
१. मान्सूनपुर्व पाऊस : यालाच प्री मान्सून रेन म्हणजेच वळीवाचा पाऊस असेही म्हणतात. ढोबळ मानाने मार्च ते मे आणि मान्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जून मध्ये ही होणारा पाऊस हा मान्सून पुर्व / वळवाचा पाऊस होय. वातावरणातील तापमान हवेचा दाब आर्द्रता आदी घटकांच्या लक्षणीय बदलामुळे अस्थिरता वाढल्याने हा पाऊस होतो. अजस्र क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस होतो. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळीवारे, गडगडाट व कडकडाट असे विजांचे तांडव, गारा किंवा गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये दिसणे ही हा पाऊस ओळखण्याची साधी लक्षणे किंवा खूण आहे. हा पाऊस दोन प्रकारे कोसळतो.
महाराष्ट्रात साधारण पणे १० आॅगस्ट २०२० ते १४ आॅगस्ट २०२० पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होता आणि १५ आॅगस्ट २०२० पासून खरा मान्सून महाराष्ट्रात सुरू झाला आहे असे माझे वैज्ञानिक अभ्यासावरून ठाम मत आहे. याबाबत भारत किंवा जगाच्या पाठीवरील कुठल्याही हवामान अभ्यासक, शास्त्रज्ञ किंवा अधिकारी यांच्याशी वैज्ञानिक चर्चा खुल्या व्यासपीठावर करण्यास मी तयार आहे.
अ) दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी १२ वाजेनंतर आणि जास्त करून २ वाजेनंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे दिवसा पडतो.
ब) सायंकाळी सुर्य मावळल्यानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे सुर्य नसतांना पाऊस पडतो.
२. मान्सूनचा पाऊस: ढगांचे पुंजके यात दिसत नाहीत तर आकाश समान एका रंगांच्या शेडमध्ये काळपट दिसते. पाऊस रिपरिप पडत राहतो. मान्सूनपूर्व पावसातली कुठलीच लक्षणे दिसत नाहीत, कारण वातावरण स्थिर झालेले असते. निंबो-स्ट्रैटसढगांची निर्मिती मान्सून काळात सर्वदूर होते व रिपरिप पाऊस पडत राहतो जे १५ आॅगस्ट पासून आपण अनुभवतो आहे.
३. मान्सून उत्तर पाऊस: हाच पाऊस मान्सून पश्चात किंवा पोस्ट मान्सून म्हणून पण ओळखला जातो. यात मान्सूनपुर्व पावसाप्रमाणेच सर्व लक्षणे वातावरणात असतात. ढोबळ मानाने याचा कालावधी आॅक्टोबर व नोव्हेंबर असा असून याची तीव्रता कमी असते.
४. अवकाळी पाऊस: डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. हिवाळी पाऊस असेही याला कधीकधी संबोधतात.
किरणकुमार जोहरे
हवामान शास्त्रज्ञ
संपर्क :9970368009
kkjohare@hotmail.com
kirankumarjohare.org
(या लेखातील मतांशी ‘कृषी पंढरी’ आणि संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही )