रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे कीड नियंत्रण प्रभावी ठरले आहे. मात्र, बेसुमार वापराने किडीच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, मित्र कीटकांचा नाश, दुय्यम किडींचा उद्रेक, पर्यावरणास हानी आदी दुष्परिणाम दिसू लागले. त्यावर जैविक कीड नियंत्रण, ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.
परोपजीवी कीटक
१) ट्रायकोग्रामा : या परोपजीवी किटकाचा उपयोग ऊस, भात, मका, ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंडअळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळींबावरील सुरसा, कोबीतील चौकोनी ठिपक्याचा पतंग इ. किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
२) चीलोनस : या परोपजीवी किटकाचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंडअळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रसारण मात्रा : २४,००० ममीज/एकर याप्रमाणे प्रसारण करावे. गरजेनुसार ३ ते ४ प्रसारणे करावीत.
३) एनकार्शिया : हे परोपजीवी कीटक बहुतांश भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, व पॉलीहाउसमधील पिकांवरील रसशोषक किडी (पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा इ.) च्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रसारण मात्रा : नुकसानकारक किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच या किटकांचे प्रसारण करावे.
४) एपिरिकॅनिया : हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरीला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर उपजीविका करतात. या कीटकांमुळे पायरीलाचे अत्यंत प्रभावी नियंत्रण होते.
प्रसारण मात्रा : २०,००० अंडी किंवा २,००० कोष/एकर. गरजेनुसार पुढील प्रसारणे करावीत.
५) अपेंटालीस (कोटेशिया) : भाजीपाला पिकांतील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, बोंडअळी, घाटेअळी इ.च्या नियंत्रणासाठी या किटकाचा उपयोग होतो.
प्रसारण मात्रा : २०,००० प्रौढ/एकर
६) ब्रेकॉन : कापसावरील बोंडअळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोडकीड, नारळावरील काळ्या डोक्याची अळी व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी या किटकाचा उपयोग होतो.
प्रसारण मात्रा : २०,००० प्रौढ/एकर
७) कोपिडोसोमा : हे परोपजीवी बटाट्यावरील पाकोळीच्या जैविक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
प्रसारण : २,००० अळ्या/एकर
८) एनासियस : हे परोपजीवी कीटक असून मोठ्या प्रमाणावर उपद्रव करणाऱ्या पिठ्या ढेकुण (मिली बग) या किडीच्या नैसर्गिक नियंत्रणात मुख्य सहभाग होता.
परभक्षी कीटक :
हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी अनेक किडींचा नायनाट करतो.
१) लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) : हे परभक्षी कीटक पिकांवरील रस शोषणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकुण इ. नुकसानकारक किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इ. पिकांवर हे मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्रसारण : १,०००/एकर
२) ग्रीन लेस वींग/ क्रायसोपा (हिरवा जाळीदार पतंग) : या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकुण, खवले कीड यांच्या सर्व अवस्था व बोंडअळीची अंडी, प्रथमावस्थ्येतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्रसारण : २,००० अंडी/एकर किंवा ४,००० अळ्या/एकर
३) प्रेयिंग मँटीड (प्रार्थना कीटक) : हे कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.
४) डीफा अफिडीवोरा (कोनोबाथ्रा) : हे मित्रकीटक जाविक कीड नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या जैविक नियंत्रणासाठी ह्यांचा उपायोग होतो. पूर्ण विकसित अळी ३०० पेक्षा अधिक मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा ३ ते ५ दिवसांत संपवते.
प्रसारण : लोकरी माव्याच्या प्रादुर्भाव दिसून येताच ५० कोष/गुंठा किंवा ४०० अळ्या प्रति एकर सोडाव्यात.
५) परभक्षी कोळी (एम्बलीसियस) : हे मित्रकीटक भाजीपाला, फुलझाडे, फुलझाडे व पॉलीहाउसमधील पिकांवरील नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
६) सिरफिड माशी : या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रस शोषक किडीला फस्त करतात. या किटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे मित्रकीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे कीड नियंत्रण प्रभावी ठरले आहे. मात्र, बेसुमार वापरणे किडीच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, मित्र कीटकांचा नाश, दुय्यम किडींचा उद्रेक, पर्यावरणास हानी आदी दुष्परिणाम दिसू लागले. त्यावर जाविक कीड नियंत्रण, ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे.
सूक्ष्म जीवजंतू/रोगकारके :
साथीचे रोग पसरवणाऱ्या सूक्ष्म जीवजंतूंचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्यापासून रोगजंतूयुक्त जैविक कीड-रोगनाशके तयार केली जातात आणि त्याचा शेतात वापर केला जातो.
जीवाणू :
१) बॅसिलस थुरीनजेन्सीस (बीटी) : या जीवाणूंचा उपायोग पतंगवार्गीय किडी उदा. कापसावील बोंडअळी, घाटेअळी, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग, पाने गुंडाळणारी अळी, तंबाखूवरील अळी आदीच्या नियंत्रणासाठी होतो. भाजीपाला, नगदी पिके, फळझाडे, फुलझाडे इ. पिकांमध्ये वापर करता येतो. प्रमाण : ०.८ ते १ किलो/एकर फवारणीसाठी वापरावे.
२) स्युडोमोनास फ्ल्युरोसंस : याचा उपयोग सर्व पिकांवरील बुरशीजन्य व जीवाणूजन्य कुज, मूळकुज, फळकुज, पानांवरील ठिपके इ. रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. डाळींबावारील नुकसानकारक तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी हा जीवाणू अत्यंत उपयुक्त आहे.
प्रमाण : १० ग्रॅम/किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), २५ ग्रॅम/१० लिटर (फवारणीसाठी) किंवा ४ किलो/एकर जमिनीमधून फवारणीसाठी, ०.५ ते १ किलो स्युडोमोनास पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून घ्यावी. हे द्रावण गाळून घेतल्यानंतर ४० मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. हे द्रावण १९५ लिटर पाण्यात मिसळून १ एकर क्षेत्रावर वापरावे. जमिनीतून वापरासाठी २ किलो स्युडोमोनास शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. जमिनीत देताना वर्षातून किमान २ वेळा (३ महिने अंतराने) द्यावे.
बुरशी :
बुरशीची लागण झाल्यास सुरवातीला किटकाच्या त्वचेवर लहानसा ठिपका दिसतो. रोगबाधीत कीटक बैचेन होऊन हालचाल मंदावते. मरण पावलेले कीटक कडक होतात. किटकाच्या बाह्य शरीरावरदेखील बुरशीची वाढ होते.
१) व्हर्टीसिलीयम लेकॅनी : ही बुरशी रस शोषक किडी उदा. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लाल कोळी, पिठ्या ढेकुण व खवले कीड या मृदू शरीरवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. फळझाडांवरील पिठ्या ढेकुण व उसावरील लोकरी मावा, पांढरी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी ही एक प्रभावी बुरशी आहे.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी किंवा ०.८ ते १ किलो/एकर (फवारणीसाठी).
१ किलो व्हर्टीसिलीयम लेकॅनी पावडर ५ लिटर पाण्यात मिसळून ४ ते ६ तास भिजवून नंतर वस्त्रगाळ करून घ्यावे. दुसऱ्या ५ लिटर कोमट पाण्यात मिसळून घ्यावे. थंड झाल्यास दोन्ही द्रावणे एकत्र करून ४० मिली स्टीकर/स्प्रेडर मिसळावे. सदर १० लिटर द्रावणात १९० लिटर पाण्यातून मिसळून १ एकर क्षेत्रावर फवारणीसाठी वापरावे. शेतात किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच पहिली फवारणी करावी. किडीचे प्रमाण कमी होईपर्यंत १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारणी करावी. या बुरशीच्या वाढीस ९० टक्के सापेक्ष आर्द्रता व २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.
२) बिव्हेरिया बॅसियाना : ही बुरशी पतंगवर्गीय किडी, भुंगेरे, हुमणी, सोंडकिडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटेअळी, केसाळ अळी, वाळवी इ.च्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा ८ किलो/एकरी (जमिनीतून)
३) मेटारायझीयम अॅनिसोप्ली : या बुरशीचा उपायोग पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, घाटे अळी, केसाळ अळी, पायरीला, खोडकीड, हुमणी, वाळवी इ. ३०० प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी) किंवा ८ किलो/एकरी (जमिनीतून)
४) न्युमोरीया रीलाई : ही बुरशी मुख्यत्वे सोयाबीन, बटाटा, कापूस व इतर पिकांवर येणाऱ्या स्पोडोप्टेरा व इतर अळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
प्रमाण : प्रमाण : ५ ग्रॅम/लिटर पाणी, ०.८ ते १ किलो एकरी (फवारणीसाठी)
५) पॅसिलोमायसीस लीलासिनस : पिकामध्ये मुळांवर गाठी करून नुकसान करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ही बुरशी वापरतात.
प्रमाण : १० ग्रॅम/किलो बियाणे (बीजप्रक्रीयेसाठी), ५० ग्रॅम/झाड (आळवणीसाठी) किंवा ४ किलो/एकरी शेणखतासोबत १:४० या प्रमाणात. जमिनीतून देण्यासाठी १० किलो पॅसिलोमायसीस पावडर ४०० किलो शेणखतात मिसळून त्यावर १ किलो गुळाचे द्रावण करून शिंपडावे. ४ ते ६ तासांपर्यंत तसेच ठेवावे. त्यानंतर जमिनीतून गादी वाफ्यावर मिसळून किंवा फळझाडांना रिंग पद्धतीने द्यावे. वर्षातून किमान दोनवेळा (६ महिने अंतराने) द्यावे.
६) ट्रायकोडर्मा : या बुरशीचा उपयोग जमिनीत वाढणाऱ्या मर, मूळकुज, खोडकुज, रॉट इ. रोगकारक बुरशी उदा. पिथियम, फ्युजारीयम, स्क्लेरोशियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, कॉलेटोट्रिकम, बोट्रायटीस इ.च्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : २५० ग्रॅम/१० किलो बियाणे (बीजप्रक्रिया), २० ते २५ ग्रॅम/ १० लिटर पाणी, ४०० ते ८०० ग्रॅम/एकरी (फवारणीसाठी), ५० ग्रॅम/झाड (आळवणीसाठी), २ किलो प्रति एकरी (जमिनीमधून)
विषाणू :
अळीच्या शरीरात विषाणूची लागण झाल्यास विषाणूची वाढ सुरु होते. विषाणूच्या वाढीसाठी लागणारे अन्नघटक उदा. प्रथिने हे अळीच्या शरीरातील पेशीतून शोषून घेतले जातात. कीटकाच्या शरीरातील सर्व पेशी नष्ट होतात.
१) एचएएनपीव्ही : या विषाणूचा वापर घाटेअळी, शेंगा पोखरणारी अळी, फळे पोखरणारी अळी, कळी व बी खाणारी अळी, बोंडअळी इ.च्या नियंत्रणासाठी हरभरा, तूर, टोमॅटो, कापूस, सुर्यफुल इ. पिकामध्ये होतो.
प्रमाण : हरभऱ्यावरील घाटेअळी, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी २०० मिली/एकर, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळी, सूर्यफुलाच्या फुल व बी खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी १०० मिली/एकर, कपाशीवरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी २०० मिली/एकर
२) एसएलएनपीव्ही : या विषाणूचा उपयोग पाने खाणारी अळीच्या (स्पोडोप्टेरा) नियंत्रणासाठी सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकांमध्ये होतो.
प्रमाण : सोयाबीन, कापूस, एरंडी इ. पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी १०० ते २०० मिली/एकर
३) एसएएनपीव्ही : केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूचा उपयोग होतो.
प्रमाण : सुर्यफुल, भुईमुग पिकावरील केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी २०० मिली/एकर
परोपजीवी सूत्रकृमी :
स्टेरनेमा व हिटरो-हॅब्डीटीस प्रजाती. यांचा उपयोग हुमणी, खोडकीड, घाटेअळी, नारळावरील काळ्या डोक्याची अळी,, बटाट्यावरील पाकोळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी इ.च्या नियंत्रणासाठी होतो.
प्रमाण : ४०,००० रोगकारक सूत्रकृमी/एकर
वनस्पतिजन्य औषधी :
कडूनिंब – कडूनिंबामध्ये अॅझाडीरॅक्टीन, निंबीन, निंबीसीडीन व सॅलीसीन इ. रसायानिक घटक असतात. परंतू, त्यातील अॅझाडीरॅक्टीन हा घटक किडींच्या विरोधात परावृत्त, भक्षणरोधक, अंडी घालण्यास व्यत्यय, वाढीवर पारीनाम, कात टाकण्यावर परिणाम व आयुष्य कमी करण्याची कार्यक्षमता असते.
तंबाखू : तंबाखूवरील निकोटीन हा घटक स्पर्शविष, जठरविष व श्वासाचे विष म्हणून कार्य करते.
सीताफळ : सिताफळातील अॅसीयेजेनीन हे रसायन व अॅकोरीन, अॅनोनीन इ. अल्कोलोइड्समध्ये कीड व रोगरोधक गुणधर्म असतात.
शेवंतीमधील पायरेथ्रम – पायरेथ्रम हा घटक किडीचे नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
या प्रमाणेच हळद, मिरची, वेखंड, निलगिरी, शेवगा, धोतरा, निर्गुडी, रुई इ. वनस्पतींचा वापर जैविक नियंत्रणात करता येतो.
तणांवरील परभक्षी किटक :
१) निकोचिटानस सोंड कीडे : प्रौढ कीटक जलपर्णीच्या शेंड्यांमध्ये जाऊन आतील गर खातात व पानांना छिद्रे पाडतात. हे किडे जलपर्णीग्रस्त तलावात प्रादुर्भावानुसार सोडावेत.
२) झायगोग्रामा भुंगेरे : हे भुंगेरे गाजर गवतावर राहून कळ्या, पाने, फुले खातात.
• जैविक नियंत्रके वापरताना…
– सामान्यतः प्रत्येक जैविक नियंत्रक हे एका विशिष्ट कीड किंवा रोगापुरतेच प्रभावी असते. उदा. ट्रायकोग्राम हा परोपजीवी कीटक त्याच्या यजमान किडीच्या फक्त अंडी अवस्थ्येतच परोपजीवीकरण करतो. किडीच्या अन्य अवस्थांवर तो परिणाम करत नाही.
– किडीमध्ये रोग उत्पन्न करणारे विषाणू हे ज्या-त्या किडीच्या अळीसाठीच खास प्रभावी असतो.
– किडीच्या वर्गाप्रमाणे खास प्रजातींचा वापर केल्यास जास्त व योग्य परिणाम मिळतात.
– परभक्षी कीटकांच्या यजमान किडी (खाद्य/भक्ष) योग्य प्रमाणात असेल तर ते शेतात व्यवस्थित स्थिरावतात व नैसर्गिकरित्या त्यांची संख्या जोमाने वाढते.
– जैविक नियंत्रकांना २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान खूप अनुकूल असते.
– बुरशीजन्य कीटकनाशकांच्या फवारणीअगोदर व फवारणीनंतर किमान एक आठवड्यापर्यंत अन्य रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके फवारणे टाळावे.
– जीवाणू, बुरशी, विषाणू किंवा कृमी आधारित जैविक कीटकनाशके कायम थंड व कोरड्या जागेवर साठवल्यास त्यांची गुणवत्ता टिकून राहते.
– जैविक नियंत्रकांच्या चांगल्या परिणामांसाठी त्यांची वापरण्याची मुदत संपण्याआधी वापर करावा.