एका दिवसात सर्वाधिक 57,584 रुग्ण बरे होण्याचा विक्रम
भारताने कोविड-19 चाचण्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एका दिवसात सुमारे 9 लाख (8,99,864) चाचण्या केल्या असून एका दिवसात केलेल्या आजवरच्या या सर्वात अधिक चाचण्या आहेत. यामुळे, आजपर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या 3,09,41,264 इतकी झाली आहे.
चाचण्यांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर, 8.81% टक्के इतका कमी राहिला आहे, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सरासरी दर 8.84%.इतका होता.
भारतात गेल्या चोवीस तासात, कोविडचे 57,584 रुग्ण बरे झाले असून हा ही नवा विक्रम आहे. याच काळात, देशात 55,079 नवे रुग्ण आढळले आहेत. आता अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्याना उपचारानंतर सुट्टी दिली जात असल्याने, आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19 लाखांच्या वर (19,77,779) पोहोचली आहे. यामुळे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या यातील तफावत 13 लाखांच्याही (13,04,613). पुढे गेली आहे.
दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर आता 73.18% टक्के इतका झाला आहे आणि कोविडचा मृत्यूदर 1.92% टक्यांपर्यंत कमी झाला आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या एकत्रित प्रयत्नामुळे तसेच केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रीट धोरणामुळे 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये CFR चा दर राष्ट्रीय सरासरी दरांपेक्षा कमी आहे. आक्रमक चाचण्यांमुळे लवकरात लवकर रुग्ण शोधणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांना योग्य वेळी अलगीकरणात ठेवता आले. त्याशिवाय, गंभीर रूग्णांवर प्रभावी उपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे,रुग्णांचा मृत्यूदर देखील कमी झाला आहे.
सध्या देशात एकून सक्रीय रुग्णांची संख्या 6,73,166 इतकी असून एकून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत हा दर 24.91% इतका आहे. देशात कोविडची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचेच या आकड्यांवरुन सिध्द झाले आहे.
देशभरात कोविडच्या चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळांमध्ये देखील सातत्याने वाढ होत आहे. सध्या देशात, एकूण 1476 प्रयोगशाळांमध्ये कोविडच्या चाचण्या होत आहेत. त्यापैकी 971 प्रयोगशाळा सरकारी तर 505 प्रयोगशाळा खाजगी आहेत.
यात,
• रियल टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 755 (सरकारी: 450 + खाजगी: 305)
• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 604 (सरकारी: 487 + खाजगी: 117)
• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा : 117 (सरकारी: 34 + खाजगी: 83)