मागील दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने बरसात केली आहे. पावसाची रिपरीप शुक्रवार सकाळपासूनच कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरुपात सुरू आहे. मुंबईसह परिसरात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर नवी मुंबई, कोकण पट्ट्यातही अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होता. गेल्या २४ तासात मुंबई शहरात चांगला पाऊस झाला. सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात काल दुपारपर्यंत ८३ पूर्णांक १३ टीएमसी इतका पाणीसाठी झाला होता. यामुळे धरणाच्या  पायथा वीज गृहातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू झाला मात्र शुक्रवारी त्याने काहीशी विश्रांती घेतली. गेल्या २४ तासात धुळे शहर आणि तालुक्यात तालुक्यात ८२ मिलीमीटर, साक्री येथे २१, शिरपूर तालुक्यात ७९ तर सिंदखेडा तालुक्यात ५८ मिलीमीटर पावसाची झाली. पावसामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना पुढच्या ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे पूर्ण, तर १२ दरवाजे एक मीटरने उघडले आहे. धरणातून  तापी नदीपात्रात ७५ हजार १२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. नदीपात्रात सोडलेले पाणी धुळे जिल्ह्यातल्या सुलवाडे बॅरेजमध्ये येत असल्याने या बॅरेजचे ६ दरवाजेही उघडले आहेत.

अकोला जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातल्या नद्या – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावतीतही जोरदार पाऊस झाला. अमरावतीच्या अनाथाश्रमात जाणारा नाल्यावरचा पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनाथाश्रमातल्या २०विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूनक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे ३५ सेंटी मीटर नी आज पहाटे उघडण्यात आले.

या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासात सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ८५ पूर्णांक २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे भामरागड तालुक्यातली पर्लकोटा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे २७ दरवाजे १ मीटरनं, तर ६ दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. धरणातून ६ हजार ५७१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. अकोला जिल्हयात  चांगला पाऊस झाला.

अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, अशातच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने नदीकाठच्या ७७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. मात्र आजपर्यंतच्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक प्रकल्पात अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा जमा झालेला नाही.