ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत

राज्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. साखर कारखान्यांकडे नोंदणी केलेला तसेच नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या ऊसाचे संपूर्ण गाळप करावे. तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करु नये, याबाबत सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऊस गाळप संपल्याशिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करु नये, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत सदस्य अब्दुल्लाह खान दुर्राणी यांनी मांडली होती. त्याला मंत्री श्री.पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ज्या जिल्ह्यांमध्ये ऊसाचे क्षेत्र अधिक आहे त्या जिल्ह्यातील गाळप आढावा घेण्यात येत आहे. साखर कारखान्यांना 160 दिवसांचा गाळप परवाना दिलेला नसून संपूर्ण ऊसाचे गाळप होईपर्यंत दिलेला आहे. त्यामुळे ऊस शिल्लक असताना साखर कारखाना बंद होणार नाही. कारखान्यांच्या कार्यक्षेत्राला असलेला ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत असेही सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.