विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी साजरी

मुंबई, दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली.

राज्यपालांनी यावेळी सर्व पाहुण्या विद्यार्थ्यांना रंग लावला व सर्वांना पुरणपोळीची मेजवानी दिली.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबई येथे शिक्षण घेत असलेले दक्षिण आफ्रिका, काँगो, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, श्रीलंका, स्वाझीलँड, पॅलेस्टाईन, नेपाळ व बांगलादेश येथील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मुंबई येथे आपल्याला सुरक्षित वाटते असे यावेळी बोलताना विद्यार्थिनींनी सांगितले तर शिक्षणानंतर भावी करिअर देखील मुंबईतच करायला आवडेल असे काही विद्यार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले.

या भेटीचे आयोजन वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ, मुंबई विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी तसेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथचे आंतरराष्ट्रीय सचिव भूषण ठाकरे उपस्थित होते.

उपस्थितांपैकी बहुतांशी विद्यार्थी वाणिज्य, विज्ञान व व्यवस्थापन शाखेचा स्नातक अभ्यासक्रम करीत आहेत तर दोन विद्यार्थी आयआयटी मुंबई येथे पीएचडी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.