कोविड -19: गैरसमज आणि वस्तुस्थिती

भारतातील कोविड-19 मुळे झालेले मृत्यू अधिकृत संख्येपेक्षा जास्त असल्याचा आंतरराष्ट्रीय पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेला दावा केवळ सैद्धांतिक आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे.  लेखक स्वतः अनेक पद्धतीतील त्रुटी आणि विसंगती मान्य करतात.

एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पत्रिकेमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखात गणितीय संकल्पना मांडणीच्या आधारे अनेक देशांसाठी सर्व कारणांमुळे अतिरिक्त मृत्यूचे अंदाज दिले आहेत. अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की 1 जानेवारी 2020 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान कोविड-19 मुळे जगभरात एकूण 5.94 दशलक्ष मृत्यूची नोंद झाली असली तरी त्या कालावधीत कोविड -19 महामारीमुळे अंदाजे 18.2 दशलक्ष (95% अनिश्चितता अंतराळ 17.1–19.6) लोक (अतिरिक्त मृत्युदराने मोजल्याप्रमाणे) जगभरात मरण पावले.

कोविड-19 मुळे जास्त मृत्यू झाल्याचा संशोधकांच्या आणखी एका गटाने मांडलेला हा आणखी एक अंदाज आहे. गणितीय संकल्पना मांडणी तंत्र म्हणजे मूलत: भविष्यवाणी करण्यासाठी वास्तविक-जगातील परिस्थितीचे गणितीय प्रतिनिधित्व तयार करण्याची प्रक्रिया आहे. असे अंदाज एकतर वास्तविक जगाच्या परिस्थितीवर उपलब्ध माहितीवर आधारित असतात किंवा उपलब्ध नसलेल्या माहितीच्या अंदाजावर  (जे वापरलेल्या तंत्रानुसार अचूकतेमध्ये भिन्न असू शकतात) आधारित असतात. बर्‍याचदा या अभ्यासांमध्ये, तुलनेने लहान वास्तविक नमुना घेणे आणि संपूर्ण लोकसंख्येला निकाल देणे समाविष्ट असते. हे लहान एकसमान देश/प्रदेशासाठी जवळपास अचूक परिणाम देऊ शकत असले तरी, मोठ्या, वैविध्यपूर्ण लोकसंख्येसाठी विश्वासार्ह परिणाम देण्यासाठी अशी तंत्रे वारंवार अयशस्वी झाली आहेत. हा अभ्यास वेगवेगळ्या देशांसाठी आणि भारतासाठी वेगवेगळ्या पद्धती विचारात घेतो, उदाहरणार्थ, या अभ्यासासाठी वापरलेल्या माहितीचे स्रोत वृत्तपत्रातील अहवाल आणि गैर-सहयोगी आढावा घेतलेल्या अभ्यासांमधून वापरलेले दिसतात. ही कार्यपद्धती इनपुट म्हणून सर्व कारणास्तव अतिरिक्त मृत्यूचा डेटा वापरते (इतर अचूकता नसलेल्या आढाव्यांच्या कार्यपद्धतीद्वारे तयार केलेले) आणि यामुळे या सांख्यिकीय अभ्यासाच्या परिणामांच्या अचूकतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होते.

आश्चर्य म्हणजे, ही कार्यपद्धती अभ्यासाधीन एकूण कालावधीसाठी विविध कालांतराने वर्तमानपत्रातील माहितीचा अवलंब करते (कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय). या कालावधीत महामारीत अनेकदा झपाट्याने वाढ झाली आणि कोणत्याही वेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये (उपराज्य स्तरावर देखील) तिचा सर्वोच्च स्तर वेगवेगळा होता. त्यामुळे या अभ्यासाद्वारे वापरलेली पद्धत तितकी अचूक नाही. छत्तीसगडमधील अतिरिक्त मृत्यूची गणना एका लेखाच्या आधारे करण्यात आली आहे (https://www.thehindu.com/news/national/other-states/chhattisgarhs-excess-deaths-at-least-48-times-covid-19-toll/article35067172 .ece) जे गृहीत धरते की एप्रिल आणि मे 2021 मध्ये 40 पट अधिक मृत्यू झाले आहेत. ज्या राज्यांमध्ये नागरी नोंदणी प्रणाली उपलब्ध होती, त्या राज्यांसाठी, महामारीदरम्यान नोंदवलेल्या मृत्यूची तुलना 2018 आणि 2019 मधील याच कालावधीतील सरासरी नोंदवलेल्या मृत्यूशी केली गेली आहे. ज्यात टाळेबंदी, प्रतिबंधात्मक क्षेत्र, चाचणी आणि संपर्क शोध, व्यापक प्रसार आणि क्लिनिकल व्यवस्थापन नियमावलीची अंमलबजावणी आणि देशातील महामारी व्यवस्थापनाचा पाया रचणारी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यासह अनेक महामारी व्यवस्थापन प्रयत्नांचा विचार केलेला नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कोविड-19 आजाराने झालेल्या  मृत्यूंचा अहवाल देण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने 10 मे 2020 रोजी ‘भारतात कोविड-19 आजाराने झालेल्या मृत्यूंची योग्य प्रकारे नोंद होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना’ जारी केल्या. कोविड आजारामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती नियमितपणे पारदर्शक पद्धतीने कळविण्यात येते आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जनतेच्या माहितीसाठी दैनंदिन पातळीवर अद्ययावत केली जाते. कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंविषयी राज्य सरकारांनी वेळोवेळी कळविलेल्या माहितीमधील अनुशेष सुद्धा नियमितपणे केंद्र सरकारकडील माहितीमध्ये अद्ययावत करून भरून काढला जातो. तसेच, कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसानभरपाई देय असल्यामुळे अशा मृत्यूंची माहिती देण्याबद्दल देखील भारतात आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. म्हणूनच, मृत्यू पावणाऱ्यांची संख्या घटवून मग नोंदली जाण्याचे प्रकार घडण्याची शक्यता कमी आहे.

येथे हे लक्षात घ्यायला हवे की, लेखकांनी स्वतःच हे मान्य केले आहे की, ‘सर्व कारणांनी होणाऱ्या मृत्यूंच्या दरावर आधारित नसलेल्या नमुनेदार अतिरिक्त मृत्युदर अंदाजांपेक्षा थेट मोजणीला कधीही अधिक प्राधान्य असेल कारण ही मोजणी त्या त्या ठिकाणी केलेली असल्याने ती नेहमीच अधिक पक्की असेल.’ त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘नेदरलँड्स आणि स्वीडनसह काही निवडक देशांमध्ये केलेल्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, महामारीच्या काळात नोंदलेल्या अतिरिक्त मृत्यूदरांमधील बहुतेक मृत्यू कोविड-19 मुळे झाले होते असा संशय व्यक्त करता येईल. मात्र, बहुतेक देशांमध्ये पुरेसे अनुभवाधारित पुरावे उपलब्ध नाहीत. या विविध देशांमध्ये महामारीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर असलेल्या वैविध्यामुळे, या विषयावर अधिक संशोधन होण्यापूर्वीच असे दृढ अंदाज न बांधण्यातच शहाणपण आहे.’

लेखकांनी हे देखील मान्य केले आहे की, ‘कडक टाळेबंदी आणि मध्यस्थ हस्तक्षेप यांच्यामुळे जादा मृत्युदरात घट होऊ शकते’  आणि ‘येत्या काळात जसजशी अधिक माहिती उपलब्ध होत जाईल तसतसे आमच्या अंदाजात अधिक सुधारणेची हमी मिळत जाईल.’ आणि त्यांनी हे देखील मान्य केले आहे की, ‘एकंदर लोकसंख्येमध्ये सर्व कारणांनी होणारे मृत्यू तसेच विशिष्ट कारणांनी होणारे मृत्यू यांच्या संख्येतील बदलाला विविध घटक कारणीभूत आहेत. म्हणून कोविड-19 मुळे झालेल्या अतिरिक्त मृत्यूदराचा अंदाज बांधण्यासाठी, महामारीच्या काळातील मृत्युदरातील बदलासाठी कारणीभूत, गोंधळून टाकणाऱ्या घटकांची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे.’

त्यांनी स्वतःच हे कबूल केले आहे की, ‘अंतिमतः, सार्स-कोव्ह-2 प्रतिबंधक लसीचा विकास आणि वापर यांच्यामुळे या विषाणूने बाधित झालेल्या तसेच इतर सामान्य लोकांच्या मृत्यूचा दर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. परिणामी, जनतेमध्ये लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढत असताना आणि या विषाणूचे नवनवे प्रकार उदयाला येत असताना कोविड-19 च्या अतिरिक्त मृत्युदराचा कल बदलेल अशी अपेक्षा आहे. या आणि संबंधित इतर घटकांमध्ये असे बदल घडून येत असताना येत्या काळात अतिरिक्त मृत्यूदर मोजणे सुरूच ठेवणे महत्त्वाचे ठरेल.’

मृत्यूइतकाच त्याबद्दलच्या माहितीचा मुद्दा देखील संवेदनशील असतो, आणि ते देखील कोविड-19 महामारीसारखे जागतिक पातळीवरील सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयीचे संकट अजूनही भेडसावत असताना, असे मुद्दे तथ्यांच्या आधारावर आणि आवश्यक संवेदनशीलतेसह हाताळायला हवेत यावर अधिक भर देण्यात आला आहे. अशा प्रकारे अंदाजांवर आधारित माहितीच्या प्रसारामुळे समाजामध्ये घबराट निर्माण करण्याची क्षमता असते, त्यातून लोकांची दिशाभूल होऊ शकते म्हणून असे प्रकार टाळायला हवेत.